Latest

Jalgaon Firing News | जुन्या वादातून हवेत फायरिंग: तरूणाला अटक

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गेंदालाल मिल परिसरात बुधवार (दि.८) रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास एकाने जुन्या वादातून हवेत फायरींचे दोन राऊंड  केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अवघ्या काही तासात नशिराबाद येथून मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात रविवार (दि.५) रोजी रात्री मौला अली मौला उरूस संदल धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातील बॅनरवरील नाव टाकण्यावरुन अली सैय्यद रज्जाक (रा. गेंदालाल मील परिसर) यांचा मुलगा काशिम याच्यासोबत संशयीत आरोपी अस्लम या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर बुधवार (दि.८) रोजी अस्लम भिकन शेख ऊर्फ बाबुराव (वय २४, रा. गेंदालाल मील, जळगाव) हा काशिमच्या घरासमोर आला व जुन्या वादातून शिवीगाळ करीत त्याने दगडफेक केली.

आवाज आणि गोंधळाने काशिमचे वडील अली सैय्यद रज्जाक परिवारासोबत घराबाहेर आले. घराबाहेर उभ्या असलेल्या अस्लमने शिवीगाळ करीत हवेत गावठी पिस्तूलने २ राऊंड फायरींग केली. याप्रकरणी अली सैय्यद रज्जाक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिरसगर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, योगेश पाटील, अमोल ठाकूर आदींनी नशिराबाद उड्डाणपूलखालून संशयित अस्लम शेख याला अटक केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT