Latest

जळगाव : लाच घेताना सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

निलेश पोतदार

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा दिवाळीची सर्वत्र धूम सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिक दिवाळीचा आनंद व सुट्ट्यांचा आनंद घेत असताना अँटी करप्शन ब्युरो यांनी आपल्या कर्तव्याचे फटाके फोडत जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना ५ लाखांची लाच घेताना अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली.

जिल्हाधिकाऱ्यांपासून पंचायत समिती व इतर कार्यालयांना पाडव्याच्या सुट्या आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी आपापल्या घरी दिवाळी साजरी करीत असताना जळगावातील पंचायत समिती कार्यालयात काल (मंगळवार) पाडव्याची शासकीय सुट्टी होती. असे असताना पाडव्याच्या दिवशीच शासकीय कार्यालयात अँटी करप्शन ब्युरो यांनी पाडव्याचे फटाके फोडून लाचखोर अधिकाऱ्यांना जेलची हवा खायला लावली.

जामनेर तालुक्यातील (38 वर्षीय) तक्रारदार हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये आरोपी तथा विस्तार अधिकारी तथा सध्या पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (वय 54) व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (वय 53) हे चौकशी पथकातील प्रमुख आहेत. तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो. त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, अशी मागणी 7 नोव्हेंबर रोजी दोघा लाचखोरांनी केली. लाच रक्कम देण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचखोरांनी दिवाळी पाडव्याचा शासकीय सुट्टीचा दिवस लाच स्वीकारण्यासाठी निवडला. एरव्ही सर्वत्र शासकीय सुटी असताना अधिकारी दिवाळीचा आनंद घेत असताना लाचखोरांनी मात्र पंचायत समितीचे दालन उघडले व तक्रारदाराकडून लाच स्वीकारली.

लाच घेताच तक्रारदाराने इशारा केला अन् एसीबीने लाचखोरांच्या मुसक्या बांधल्या. लाचखोरांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाणे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT