जळगाव : पुढारी वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासोबत १५ आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान केले आहे. विवाहासाठी तिथीची गरज असते. ती तिथी लवकरच येईल. अजित पवार हीच राष्ट्रवादी, जे बोलतील तोच आमदारांचा आकडा असेल", असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे गट आणि भाजपासमवेत सरकारमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मध्यंतरी अजित पवार गायब असल्याच्याही अफवा उठल्या होत्या. मात्र, त्यानंतर खुद्द अजित पवारांनीच त्यावर खुलासा केल्यामुळे या चर्चांवर पडदा पडला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा अजित पवार मविआतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
मविआची वज्रमूठ फुटलेली…
गुलाबराव पाटील हे जळगावात आले होते. यावेळी त्यांच्याशी मीडियाने संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवारांसोबत बरेच आमदार आहे. मात्र, कोणत्याही लग्नासाठी तिथी आवश्यक आहे. सध्या अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. अजून कूळ बघावे लागेल. गुण जुळवावे लागतील व नंतरच ते काम करावे लागेल. आकडा ते सांगतील तोच असेल, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. नागपूरमध्येही महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून ही सभा वज्रमूठ आहे की, फुटलेली मुठ आहे हे उद्या दिसेल अशी टीका देखील मंत्री पाटलांनी केली आहे.