पुढारी ऑनलाईन डेस्क
दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात हिंसाचारानंतर (Jahangirpuri Violence) अनाधिकृत बांधकामावर कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दंगलग्रस्त भागात कारवाईचा बुलडोझर सुरु असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या कारवाईत सर्व अनाधिकृत घरे आणि दुकान पाडण्यात येत आहेत. हातगाड्या हटवल्या जात आहेत. या कारवाई दरम्यान कोणताही वाद निर्माण होऊ म्हणून दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जवळपास २००० ते ३००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या कारवाईत आरोपींच्या घरावरही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, बांधकाम पाडण्याचे काम सुरु असतानाच, नोटीस न देता कारवाई केल्याने सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम पाडण्याचे काम त्वरीत थांबवा असे आदेश दिले आहेत. परिस्थिती 'जैसे थे' "ठेवण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात शनिवारी हनुमान जयंती दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात ९ जण जखमी झाले होते. यामध्ये ८ पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला गोळी लागली. याप्रकरणी आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोन संशयित आरोपी हे अल्पवयीन आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी १० टीम स्थापन केल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी याप्रकरणील संशयित महिला आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथक परिसरात गेले होते. त्यावेळी काही घरांमधून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणाव वाढला. सीसीटीव्ही आणि चौकशीनंतर भविष्यात या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
हेही वाटलतं का?