Latest

धक्कादायक ! कर्मचारीच जेलभेदी ; कैद्यांना पुरविला मोबाईल

अमृता चौगुले
 येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचार्‍यानेच कैद्यांना सीमकार्ड आणि मोबाईल पुरविल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. मीनानाथ कराळे असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालू वर्षात कारागृहात मोबाईल आढळून आल्याचे तब्बल 9 गुन्हे येरवडा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे :  येरवडा हे राज्यातील महत्त्वाचे कारागृह आहे. सध्या तेथे विविध गुन्ह्यांतील सात हजार कैदी आहेत. त्यामध्ये गंभीर गुन्ह्याबरोबरच देशविरोधी कृत्यात सहभागी असलेले आरोपीदेखील बंदी आहेत. येथील सुरक्षा व्यवस्था भेदून कैद्यांना मोबाईल पुरविले जात होते. कैदीदेखील थेट कारागृहातूनच आपल्या लोकांशी संपर्क साधत होते. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले.  पुणे शहरातील बहुतांश गुन्हेगार येरवडा कारागृहात बंदी आहेत.
त्यामध्ये टोळीप्रमुख आणि त्यांच्या पंटर लोकांचा समावेश आहे. काही टोळ्यात वर्चस्ववादाचा संघर्ष आहे. येरवडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या 9 गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. कारागृहात मोबाईल सापडल्यामुळे अनेक प्रश्न  निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त  रितेशकुमार यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी या मोबाईल सापडलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्याकडील तपासात कारागृहातील कर्मचारी कराळे हा कैद्यांना मोबाईल उपलब्ध करून देत असल्याचे समोर आले.
असे फुटले मोबाईलला पाय 
कराळे याने बंदी असलेला आरोपी गोविंद ताकभाते याला कारागृहात मोबाईल दिला. ताकभाते याच्याकडे गुन्हे शाखेने तपास केला. त्या वेळी कैदी लक्ष्मण वाघ याने, कराळेने आपल्याला मोबाईल दिल्याचे सांगितले. सीमकार्डची सोय करण्यास सांगितल्यानंतर कराळे याला वाघ याच्या आईच्या नावावर सीमकार्डची सोय कर, असे म्हटले होते. त्या वेळी कराळे याने सीमकार्ड दिल्याचे ताकभाते याने सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणखी दोन व्यक्तींची चौकशी केली. त्यामध्ये आमिर फरिद शेख ऊर्फ आंड्या आणि मोबाईल दुकानदार अल्पेश देवसिंग राजपुरोहित. त्या वेळी कराळे याने जेल रोड पोलिस चौकीजवळ न्यू भैरव कम्युनिकेशन मोबाईल शॉपीमधून मोबीन शेख नावाने मोबाईल खरेदी केल्याचे समोर आले.
पूर्वीच्या एका प्रकरणात मीनानाथ कराळे या कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले होते. सध्या त्याची नाशिक येथे बदली केली आहे. मोबाईल प्रकरणाबाबतचा अहवाल अद्याप पुणे पोलिसांकडून प्राप्त झालेला नाही, अहवाल मिळताच योग्य ती कारवाई संबंधित कर्मचार्‍यावर करण्यात येणार आहे. 
                                                                                    – सुनील ढमाळ,  कारागृह अधीक्षक, येरवडा.
कारागृहाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी येरवडा कारागृहातील मोबाईल प्रकरणाची गंभीर दखल घेऊन काही तत्कालीन अधिकारी आणि कर्मचार्‍यांची थेट उचलबांगडी केली. तसेच अंतर्गत सुरक्षेत वाढ करून कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या अंतर्गत कर्तव्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक जेलसाठी एक सुरक्षा अधिकारी नेमण्यात आला आहे. दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत.
                                                           – डॉ. जालिंदर सुपेकर,  विशेष पोलिस महानिरीक्षक कारागृह.
हेही वाचा :
SCROLL FOR NEXT