Latest

Gujarat Assembly Elections | गुजरातमध्ये ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला, केजरीवालांकडून इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा

दीपक दि. भांदिगरे

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Elections) इसुदान गढवी हे आम आदमी पक्षाचे (AAP)  मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहे. इसुदान गढवी हे आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी इसुदान गढवी यांची गुजरातमधील आगामी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. गढवी हे माजी टीव्ही पत्रकार असून २०२१ मध्ये ते आपमध्ये दाखल झाले होते. गढवी हे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. १० जानेवारी १९८२ रोजी गुजरातमधील द्वारका येथे जन्मलेल्या गढवी यांनी मीडिया प्रोफेशनल म्हणून काम केले आहे.

गढवी यांनी सुरुवातीला दूरदर्शनसाठी काम केले होते. नंतर पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गुजरातच्या डांग जिल्ह्यातील जंगलतोडचा १५० कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. यामुळे सरकारला दोषी आणि अधिकार्‍यांवर कारवाई करावी लागली होती.

गुजरातचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा? यासाठी २९ ऑक्टोबर रोजी 'आप'ने लोकांना एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, व्हॉईस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधून आपले मत नोंदवण्याचे आवाहन केले होते. 'आप'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी सुमारे १५ लाख प्रवेशिका आल्या होत्या. आपल्या पसंतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासाठी गुरुवारी सायंकाळी ५ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली होती.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी सांगण्यात आले. हिमाचल प्रदेशसोबत ८ डिसेंबर रोजी या राज्याचा निकाल घोषित केला जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात ८९ तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
गुजरात विधानसभेच्या (Gujarat Assembly Elections) एकूण १८२ जागा असून गत म्हणजे २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने ९९ तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय इतर पक्ष आणि अपक्षांच्या वाट्याला ६ जागा गेल्या होत्या. गुजरातमध्ये यावेळी ४.९ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यातील नवीन मतदारांची संख्या ३ लाख २४ हजार ४२२ इतकी आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना ५ नोव्हेंबर रोजी निघेल. उमेदवारांना १४ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. १५ तारखेला अर्जांची छाननी केली जाईल. १७ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर १ डिसेंबर रोजी मतदान होईल.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT