Latest

Israel attacks Iran | हल्ल्याचा बदला! इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रे डागली, इस्फहान प्रांतात अनेक स्फोट, दुबई- इराण विमान सेवा रद्द

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इस्रायलने इराणवरील काही भागात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. पण इराणच्या सैन्याने शुक्रवारी पहाटे इस्रायलचा हल्ला परतावून लावत त्यांचे ड्रोन नष्ट केले, असे वृत्त इराण सरकारच्या अधिकृत मीडियाने दिले आहे. यामुळे मध्य-पूर्वेत तणाव वाढला आहे. इराणच्या FARS वृतसंस्थेच्या वृत्तानुसार, इस्फहान प्रांतातील लष्करी तळाजवळ अनेक स्फोट ऐकू आले आहे. जेथे लढाऊ विमाने आहेत. इस्रायलच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रांतांमध्ये इराणची हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. (Israel attacks Iran)

इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दोल्लाहियान यांनी सीएनएनशी बोलताना म्हटले आहे की, जर इस्रायलने इराणवर आणखी कोणतीही लष्करी कारवाई केली तर त्याला "तात्काळ आणि उच्च पातळीवर" प्रत्युत्यर दिले जाईल.

इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोणताही क्षेपणास्त्र हल्ला झाला नाही आणि हे स्फोट इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा सक्रियतेचा परिणाम आहेत. एका स्त्रोताच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की या हल्ल्यात अमेरिकेचा सहभाग नाही. पण या हल्ल्यापूर्वी इस्रायलने तसे सूचित केले होते.

इराणने इस्रायल विरुद्ध सूड उगवत गेल्या रविवारी मध्यरात्री ३ वाजता इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे मिळून एकापाठोपाठ ३०० हल्ले केले. अमेरिकन लष्कराने यापैकी अनेक ड्रोन कोसळण्यापूर्वी हवेतच पाडले; तर इस्रायलच्या आयर्न डोमने तसेच एअरो ३ डिफेन्स सिस्टीमने इराणच्या क्षेपणास्त्रांचा मारा रोखला. इराणचा ९९ टक्के मारा आम्ही हवेतच निष्प्रभ केला. बहुतांश ड्रोन, क्षेपणास्त्रे वाटेतच पाडली, असा दावा इस्रायलच्या लष्कराने केला होता. इराणच्या या हल्ल्याला इस्रायलने चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. (Israel Iran War)

दुबई ते इराण विमान सेवा रद्द

तेहरानमधील इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केल्यानंतर शुक्रवारी सकाळी दुबईहून तेहरानला जाणारे विमान परत संयुक्त अरब अमिरातीकडे वळवण्यात आले. दुबई ते इराण दरम्यानची सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती फ्लायदुबईच्या प्रवक्त्याने दिली आहे. (Israel attacks Iran)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT