ढाका; पुढारी ऑनलाईन
होळीच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉनच्या श्री राधाकांता मंदिरात (ISKCON Radhakanta temple) जमावाने हल्ला केल्याची घटना घडलीय. सुमारे २०० लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. तसेच या दरम्यान जमावाने लुटमार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. हा हल्ला ढाका येथील राधाकांता मंदिरात झाला आहे. हे मंदिर इस्कॉन मंदिराचा एक भाग आहे.
काल संध्याकाळी भाविक गौर पौर्णिमा उत्सवाच्या तयारीत असताना ढाका येथील श्री राधाकांता मंदिराच्या आवारात २०० लोकांच्या जमावाने घुसून हल्ला केला. यात तिघे जखमी झालेत. सुदैवाने, या दरम्यान पोलिसांना बोलावल्याने हल्लेखोर पळून गेले, अशी माहिती कोलकाता येथील इस्कॉनचे (ISKCON Kolkata) उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली आहे.
मंदिरातील भाविकांवर हल्ला होणे हा गंभीर आणि चिंतेचा विषय आहेत. आम्ही बांगलादेश सरकारला विनंती करतो की, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी आणि देशातील हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवावी, असे दास यांनी म्हटले आहे.
बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या Voice Of Bangladeshi Hindus या ट्विटर अकाउंटवर मंदिरातील हल्ल्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौमुनी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधाकृष्ण गौरा नित्यानंद मंदिरात जमावाने हल्ला केला होता. यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.