Latest

Rutuja Latke | ऋतूजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यात अडचण काय?, हायकोर्टाचा BMC ला सवाल

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्वच्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या ऋतूजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा स्वीकारायला अडचण काय? असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले. ऋतूजा लटके यांनी राजीनामापत्र दिलाय, रितसर सगळ्या बाबींची पूर्तता केलीय. मग राजीनामा स्वीकारायला काय अडचण आहे? असा खडा सवाल न्यायालयाने केला. याचे ताबडतोब उत्तर द्या, असा निर्देश देत सुनावणी २.३० निश्चित केली आहे.

पालिका राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळा करीत असल्याने ऋतूजा लटके यांच्या वतीने ॲड. विश्वजीत सावंत यांनी बुधवारी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी सुरु आहे. यावेळी अॅड. सावंत यांनी ऋतूजा लटकेंनी पालिका कर्मचारीपदाचा राजीनामा दिला आहे. याचवेळी सर्व औपचारिक बाबींची पूर्तताही केली आहे. त्यानंतरही पालिका प्रशासनाने ऋतूजा लटके यांच्या कर्मचारीपदाचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्यास जाणूनबुजून चालढकल सुरु ठेवली आहे. जेणेकरुन अंधेरी-पूर्वच्या पोट निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस उलटून जाईल व ऋतूजा लटके निवडणूक लढवू शकणार नाहीत. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाला राजीनामा मंजुरीचे पत्र तातडीने जारी करण्याबाबत निर्देश द्या, अशी विनंती केली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने ऋतुजा लटके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी मुंबई महापालिकेच्या नोकरीचा त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज गुरुवारी सुनावणी सुरु आहे. राजकीय दबावापाोटीच राजीनामा स्‍वीकारलेला नाही, असा युक्‍तीवाद लटके यांचे वकील विश्‍वजीत सावंत यांनी केला आहे. तर राजीनामा मंजूर व्‍हावा यासाठी एक महिन्‍याची रक्‍कम भरली आहे, असेही त्‍यांनी सांगितले. राजकीय दबावापोटी राजीनामा स्‍वीकारलेला नाही असे युक्‍तीवाद लटकेंच्‍या वकिलांनी केला.

महापालिकेच्‍या वतीने ॲड. राजू साखरे यांनी युक्‍तीवाद केला. ते म्‍हणाले, त्‍यांचा राजीनामा योग्‍य पद्धतीने सादर केलेला नाही. त्‍यांनी एक महिन्‍याच्‍या पगाराची रक्‍कम जमा केली याचा अर्थ तत्‍काळ राजीनामा मंजूर करावा, असे नाही. त्यावर न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले आहे. लटके यांच्‍यांबाबत पालिका भेदभाव का करत आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात काय अडचण आहे, असा सवाल करत न्यायालयाने लटके यांच्‍या राजीनाम्‍यावर पालिकेने दुपारी २.३० वाजता उत्तर द्‍यावे, असे निर्देश दिले आहेत.

ऋतुजा लटके यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा प्रशासनाने स्वीकारला नाही. त्यामुळे शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली होती. तातडीने राजीनामा मंजूर करण्यासाठी पालिका कर्मचारी सेवा नियमानुसार एक महिन्याचा पगारही पालिकेच्या कोषागारमध्ये जमा करण्यात आला आहे. याचाच आधार घेऊन, न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

ऋतुजा लटके यांनी महाडेश्वर व शिवसेनेच्या अन्य नेत्यांसोबत पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. राजीनामा मंजूर करण्यासाठी पालिका कर्मचारी सेवा नियमामध्ये काही प्रक्रिया असतात. यासाठी किमान ३० दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यानंतरच राजीमामा मंजूर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी दिले होते..

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी  देण्याचा निर्णय या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यानुसार लटके यांनी गेल्या २ सप्टेंबरला पालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्यात त्यांनी अटी घातल्या होत्या. आपल्याला उमेदवारी मिळाली तर राजीनामा मंजूर करावा. जर मिळाली नाही तर राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यात करण्यात आली होती. त्यावर पालिकेने महिनाभराने उत्तर देत असा राजीनामा मंजूर करता येत नसल्याचे कळवले. परिणामी, लटके यांनी ३ ऑक्टोबरला सुधारित राजीनामा दिला आणि तो तात्काळ मंजूर व्हावा म्हणून नियमानुसार १ महिन्याचा पगारही कोषागारात जमा केला. तरीही हा राजीनामा मंजुरीच्या प्रतीक्षेत होता.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT