Latest

Leo Varadkar | भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा, दिले ‘हे’ कारण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. लिओ वराडकर यांनी "वैयक्तिक आणि राजकीय, पण मुख्यतः राजकीय कारणांमुळे" आश्चर्यचकितपणे राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. फाईन गेल पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर वराडकर २०१७ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान आणि आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान बनले होते.

लिओ वराडकर हे मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधील मालवण येथील वराड गावचे आहेत. जून २०१७ मध्ये ते पहिल्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

बुधवारी डब्लिनमधील सरकारी इमारतींच्या बाहेर सहकाऱ्यांच्या भेटीला आलेले वराडकर म्हणाले की त्यांना असे वाटते की यापुढे मी पदासाठी "सर्वोत्तम व्यक्ती" नाही. पुढील उत्तराधिकारी निवडून येईपर्यंत आपण पंतप्रधानपदी राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

"मी आजपासून (पक्षाचा) अध्यक्ष आणि फाईन गेलच्या पक्षनेते पदाचा राजीनामा देत आहे. माझा उत्तराधिकारी मिळाल्यानंतर मी आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन," असे वराडकर म्हणाले.

आपल्या राजीनाम्याचा निर्णय हा "अनेकांसाठी आश्चर्यचकित आणि काहींना नाराज" करणारा असेल असे मानून वराडकर म्हणाले की, देशाचे हित लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे.

आघाडी सरकारमधील फियाना फेलचे नेते आणि आयर्लंडचे उपपंतप्रधान मायकेल मार्टिन यांनी, वराडकर यांचा राजीनाम्याचा निर्णय "अभूतपूर्व" घडामोड असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

वराडकर यांचे वडील भारतीय वंशाचे आहेत. तर त्यांच्या आई आयरिश आहेत. ते डॉक्टर झाल्यानंतर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्यांनी संसदेत प्रवेश केला होता. २०१५ मध्ये आरोग्य मंत्री असताना वराडकर यांनी आयरिश नॅशनल रेडिओवर आपण समलिंगी असल्याची जाहीर केले होते. समलिंगी जोडप्यांना विवाह करण्याची परवानगी देणाऱ्या ऐतिहासिक विवाह समानता विधेयकाच्या समर्थनार्थ त्यांची भूमिका राहिली.

 २०१९ मध्ये आले होते सिंधुदुर्गात

 २०१९ मध्ये वराडकर यांनी सिंधुदुर्गातील त्यांचे मूळ गाव वराडला भेट दिली होती. "हा माझा अगदी महत्त्वाचा क्षण आहे. मी इथे माझे आई- वडील, माझ्या बहिणी आणि त्यांच्या कुटुंबियासोबत इथे आलो आहे. ही माझा एक कौटुंबिक भेट आहे." असे वराडकर यांनी त्यावेळी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT