Latest

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर आयपीएलसाठी फिट! पण डॉक्टरांनी दिली ‘वॉर्निंग’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) रणजी ट्रॉफीच्या विदर्भाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पाठ दुखीमुळे दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करता आले नाही. अशा परिस्थितीत तो आयपीएल 2024 चे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही असे वृत्त समोर आले होते. पण शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅम्पमध्ये सामील होत आपण फिट असल्याचे श्रेयस खुलासा केला. तसेच रविवारी त्याने इंट्रा-स्क्वाड टी-20 सामन्यातही भाग घेतला. असे असले तरी केकेआरच्या कर्णधाराला मोठा इशारा देण्यात आल्याचे समजते आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, केकेआरच्या कर्णधाराने मुंबई आणि नंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) बंगळूर येथे मणक्याच्या तज्ज्ञांची भेट घेऊन उपचार घेतले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित केले. मात्र, चेंडूचा बचाव करताना त्याला फुटवर्क करण्याबाबत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अय्यर (Shreyas Iyer) त्याच्या पाठीच्या दुखण्यावरून नेहमीच चर्चेत राहिला आहे. याच दुखापतीमुळे तो रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना खेळू शकला नव्हता. तसेच विदर्भविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या दुस-या डावात तो क्षेत्ररक्षण करू शकला नाही. पण अय्यर हा तंदुरुस्त असल्याचे एनसीएने घोषित केले. यावरून एनसीएच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान अय्यरने पहिल्यांदा पाठ दुखीची तक्रार केली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यामुळे तो आयपीएल 2023 खेळू शकला नाही. तो आशिया कप 2023 मध्ये खेळला आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत त्याने 530 धावा केल्या. मात्र, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला.

SCROLL FOR NEXT