पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2024) पुढील आवृत्ती भारतात खेळली जाणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मार्च 2024 मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी आज (दि.१९) 'आयपीएल'चा लिलाव होणार आहे. दुबई येथे पार पडणार्या लिलाव प्रक्रियेत एकूण 333 क्रिकेटपटूंपैकी ७७ जणांवर बोली लागणार आहे. यासाठी १० संघ २६२ कोटी रुपयांची गुंतवणूक होतील. सर्वांच्या नजरा गुजरात टायटन्सवर असतील. कारण मुंबई इंडियन्समध्ये गेलेल्या हार्दिक पंड्याची जागा कोण घेणार या प्रश्नाचे उत्तरही आज मिळण्याची अपेक्षा आहे. या संघांकडे बोलीसाठीचे सर्वाधिक ३२ कोटी रुपये शिल्लक आहेत.
सहभागी संघांना 77 स्लॉट आहेत, त्यापैकी 30 विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. 23 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे, तर 13 खेळाडूंनी 1.5 कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये राहणे पसंत केले आहे. 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत, ज्यात दोन सहयोगी देशांचा समावेश आहे. कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या 116 आहे, तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या 215 आहे.
कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक १२ जागा आहेत. तर गुजरातनंतर सर्वाधिक ३२.७ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयपीएल खेळणार्या १० संघांपैकी लखनौकडे सर्वात कमी म्हणजे 13.2 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर या संघाला ६ खेळाडूंची आवश्यकता आहे.
आयपीएलच्या आजच्या बोलीमध्ये शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, रचिन रवींद्र यांसारख्या कॅप्ड क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, काही अनकॅप्ड युवा क्रिकेटपटूंचा समावेश असेल.
चेन्नई सुपर किंग्जकडे ३१.४ कोटी रुपये शिल्लक आहेत. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत धोनीची टीम शार्दुल ठाकूरवर 10 कोटी रुपये खर्च करू शकते, अशी शक्यता आहे. अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली आहे. आता चेन्नई त्याच्या जागी मनीष पांडेला स्थान देईल. असे मानले जात आहे. जोस हेझलवूडचाही विचार होण्याची शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडे २८.९५ कोटी रुपये शिल्लक आहेत. हर्षल पटेलशिवाय हा संघ शार्दुल ठाकूर, जोश इंग्लिस, वानिंदू हसरंग आणि स्थानिक क्रिकेटपटू प्रियांश राणा यांच्यावर बोली लावू शकतो. तसेच, समीर रिझवी आणि स्वस्तिक चिकारा, ज्यांनी यूपी टी-२० लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ते देखील त्याच्या नजरेत असतील.
गुजरात टायटन्सकडे ३८.१५ कोटी रुपये शिल्लक आहेत. हार्दिकची जागा भरण्यासाठी गुजरात शार्दुल, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजमतुल्ला ओमरझाई या अष्टपैलू खेळाडूंवर बाजी मारू शकतो.
केकेआरकडे ३२.७ कोटी रुपये शिल्लक आहेत. या संघाला वेगवान गोलंदाजांची गरज आहे. त्यामुळे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, हर्षल पटेल आणि रचिन रवींद्र यांच्यासाठी केकेआर बोली लावेल, असे मानले जात आहे.
मुंबई इंडियन्सकडे १७.७५ कोटी रुपये शिल्लक आहेत. अनकॅप्ड भारतीय क्रिकेटपटू त्याच्या नजरेत असतील. फिरकीपटू मानव सुतार, दर्शन मिसाळ यांच्याशिवाय वानिंदू हसरंगा आणि आशुतोष शर्मा यांच्याही नावाचा मुंबई विचार करेल, अशी शक्यात आहे.
लिलाव प्रक्रियेच्या वेळेत बदल (IPL 2024)
'आयपीएल'चा पहिला लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार होता; पण आता त्याची वेळ बदलली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल आणि भारतीय वेळेनुसार, लिलाव दुपारी 1.00 वाजता सुरू होईल.
'आयपीएल' लिलावासाठी 333 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी 23 खेळाडू आहेत ज्यांनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. सध्या 'आयपीएल'च्या आगामी हंगामासाठी 77 खेळाडूंची जागा रिक्त आहे, याचा अर्थ लिलावात जास्तीत जास्त खेळाडू विकले जाऊ शकतात. त्यापैकी 30 परदेशी खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
लिलावासाठी खेळाडूंची यादी 'बीसीसीआय'ने काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. यात एकूण 333 खेळाडूंचा समावेश असून, यापैकी 214 खेळाडू हे भारतीय, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. दोन खेळाडू कसोटीचा दर्जा प्राप्त नसलेल्या देशांचे आहेत. या खेळाडूंपैकी 116 हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले, तर 215 हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आहेत.
'आयपीएल'मधील दहाही संघांनी आगामी हंगामासाठी संघात कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे गेल्या महिन्यात जाहीर केली होती. यात काही आश्चर्यकारक निर्णयही समाविष्ट होते. तसेच काही संघांनी खेळाडूंची अदलाबदल करून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनही बहुतांश संघ समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठीच खेळाडू लिलाव महत्त्वाचा ठरतो. यात उपलब्ध असलेल्या आणि आपल्याला गरज असलेल्या खेळाडूंवर बोली लावून त्यांना संघात दाखल करून घेण्याचा फ्रँचायझींचा प्रयत्न असतो.
हेही वाचा :