Latest

Sisanda Magala : धोनीच्या CSK मध्ये ‘वजनदार’ सिसांडा मगालाची एन्ट्री!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : धोनीच्या सीएसके (MS Dhoni CSK) संघात द. आफ्रिकेच्या सिसांडा मगाला (Sisanda Magala) या नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. दुखापतग्रस्त काईल जेमिसनच्या जागी त्याची निवड झाली असून आयपीएलच्या 16 व्या हंगामात (IPL 16th season) त्याचे कसे प्रदर्शन असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

किवी गोलंदाज जेमिसनला डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएलच्या मिनी-लिलावात सीएसकेने 1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण आयपीएलचा (IPL) 16 वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाठदुखीच्या कारणास्तव तो स्पर्धेतून बाहेर पडला. अखेर त्याची रिक्त जागा फ्रँचायझीने भरून काढली आहे. एसए लिगमध्ये लक्षवेधी गोलंदाजी करणा-या 'वजनदार' 32 वर्षीय सिसांडा मगालाची (Sisanda Magala) यासाठी निवड करण्यात आली. त्याला सीएसकेने 50 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात समावेश करून घेतले आहे. मगाला यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही.

कोण आहे 'वजनदार' सिसांडा

सिसांडाचे (Sisanda Magala) वजन 80 किलोपेक्षा जास्त आहे, पण वजनदार शरीर असूनही त्याचा खेळ जबरदस्त आहे. केवळ वेगवान गोलंदाजीच नाही तर खालच्या क्रमांवर फलंदाजी करताना तो मोठे फटके खेळून कमी चेंडून महत्त्वपूर्ण धावा करतो. क्षेत्ररक्षणातही तो चपळ असून यॉर्कर बॉल फेकण्यातही माहीर आहे. अशा या वजनदार सिसांडाचा कर्णधार धोनी कसा वापर करतो, हे येत्या हंगामातच दिसेल. जेव्हापासून तो सीएसकेशी जोडला गेला आहे, तेव्हापासून त्याचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सिसांडाने 2021 मध्येच द. आफ्रिकेसाठी वनडे आणि टी-20 पदार्पण केले. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द काही खास नाही. अष्टपैलू असणारा सिसांडा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मानला जातो. द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनही सिसांडाच्या गोलंदाजीचा चाहता आहे. त्याने आतापर्यंत पाच एकदिवसीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, सिसांडाने दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे सहा आणि तीन विकेट घेतल्या आहेत. तर दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 7 आणि 16 धावा केल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या एसए 20 लिग स्पर्धेत (SA 20) सिसांडाने सनरायझर्स इस्टर्न केपकडून दमदार कामगिरी केली. मगालाने या स्पर्धेतील 12 सामन्यात 14 बळी घेतले. तो सनरायझर्सचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अंतिम सामन्यात सिसांडाने 30 धावांत 2 बळी घेतले आणि सनरायझर्सला पहिल्या सत्रातच चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.

टी20 च्या एकूण रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर सिसांडाने 127 सामन्यात 136 विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना आक्रमक त्याने 123.52 च्या स्ट्राईक रेटने 735 धावा फटकावल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 16 व्या हंगामाचा पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. उद्घघाटन सामन्यात सिसांडाला सीएसकेच्या प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT