Latest

IPL 2023 : ‘या’ खेळाडूला 10 धावा आणि 2 षटके टाकण्याचे मिळाले 1 कोटी!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 मध्ये असे काही खेळाडू होते जे कमी किमतीत विकले जात असतानाही त्यांनी आपल्या स्फोटक कामगिरीने विशेष छाप पाडली. याउलट, काही खेळाडू असे होते की, ज्यांना विविध फ्रँचायझींनी चढ्या किमतीत खरेदी केले होते, या अपेक्षेने की ते त्यांच्याकडून चांगली कामगिरी करतील. पण या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. या दोन श्रेणींव्यतिरिक्त काही खेळाडू असे होते ज्यांची कोट्यवधी रुपयांमध्ये खरेदी झाली पण त्यांना खेळण्याची पुरेशी संधी मिळाली नाही.

इंग्लंडचा जो रूट (Joe Root) असाच एक खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने (RR) त्याला एक कोटी रुपयांना खरेदी केले तेव्हा या खेळाडूला खेळण्याची पुरेशी संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. रूटने राजस्थान रॉयल्सच्या सराव सत्रात घाम गाळला, पण प्रत्यक्ष सामन्यावेळी तो बेंचवरच बसलेला दिसला. (IPL 2023)

रुटला आरआरच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकले नाही. एक कोटी मोजूनही त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान का देण्यात आले नाही? असा प्रश्न वारंवार तज्ज्ञांनी उपस्थित केला. यावर बरीच चर्चाही झाली. मात्र, नंतर तीन सामन्यांत रूटला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले पण त्याला फक्त एकदाच फलंदाजीची संधी मिळाली. रूटने त्याच्या एकमेव डावात 10 धावा केल्या. तर फिरकी गोलंदाजी करताना त्याने 2 षटके टाकली पण 14 धावा देऊनही त्याला विकेट मिळाली नाही. रूटचा राजस्थान रॉयल्सने योग्य वापर केला नाही असे काहींनी व्यक्त केले आहे. (IPL 2023)

टी-20 मध्ये 2 हजारांहून अधिक धावा केल्या

जो रूटने 90 टी-20 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 32.54 च्या सरासरीने 2083 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट जवळपास 126.70 आहे. रूटने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टी-20 सामन्यात 22 विकेट्सही घेतल्या आहेत.

SCROLL FOR NEXT