Latest

IPL 2023 : राहुल द्रविडमुळे चमकले आयुष बदोनीचे नशीब

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या 38 व्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंटस्ने पंजाब किंग्जला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांमध्ये 5 विकेटस्च्या मोबदल्यात 257 धावा कुटून काढल्या होत्या. ही आयपीएलमधील दुसरी सर्वात मोठी सांघिक धावसंख्या ठरली. पंजाबच्या संघाला 201 धावांत गुंडाळत लखनौने हा सामना 56 धावांनी जिंकला होता. (IPL 2023)

लखनौच्या विजयामध्ये फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या पहिल्या पाचपैकी 4 फलंदाजांनी 30 हून अधिक धावा जमवल्या. त्यात 23 वर्षीय युवा फलंदाज आयुष बदोनी याने 24 चेंडूंमध्ये 43 धावा कुटून काढल्या. आयुष बदोनीचा इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. त्याने याचवर्षी दिल्लीसाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच आपल्या तिसर्‍या सामन्यातच 191 धावांची तुफानी खेळी खेळली होती. गौतम गंभीरने त्याला लखनौ सुपर जायंटस् संघाशी जोडले. आयुष हा फलंदाजीसोबतच ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो. (IPL 2023)

आयुषची क्रिकेटपटू बनण्याची सुरुवात ही घराच्या छतावरून झाली होती. त्याचे वडील विवेक बदोनी घराच्या छतावर ठराविक ठिकाणी दगड ठेवायचे. त्यानंतर आयुषला गॅप शोधून फटके मारायला सांगायचे, असे दररोज चालायचे. हेच तंत्र आज त्याला क्रिकेटमध्ये उपयुक्त ठरत आहे. तो आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर चौफेर फटकेबाजी करत आहे. पंजाबविरुद्ध केलेल्या 43 धावांच्या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार खेचले होते.

आयुष बदोनीमधील गुणवत्ता राहुल द्रविडने 2018 मध्ये ओळखली होती. तेव्हा आयुष 19 वर्षांखालील क्रिकेट खेळत होता. तर राहुल द्रविड हा या संघाचा प्रशिक्षक होता. त्याची तेव्हा भारतीय संघात निवड झाली, तसेच त्याला आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र, न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची निवड झाली नव्हती.

त्यानंतर दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी आयुषला खूप परिश्रम घ्यावे लागले होते. 2020 मध्येच त्याचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण झाले असते. मात्र, डीडीसीएच्या तत्कालीन क्रिकेट सल्लागार समितीचे चेअरमन अतुल वासन यांच्या शिफारशीनंतरही निवड समितीने त्याला संघात स्थान दिले नव्हते. एक वर्ष वाट पाहिल्यावर आयुष बदोनीला दिल्लीच्या टी-20 संघातून खेळण्याची संधी मिळाली. तिथेच गौतम गंभीरची नजर त्याच्यावर पडली आणि लखनौने 2022 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT