Goa Drug Case : गोव्यात अमली पदार्थ प्रकरणी रशियन ऑलिम्पिकपटूला अटक; रशियाचा माजी पोलीसही अटकेत | पुढारी

Goa Drug Case : गोव्यात अमली पदार्थ प्रकरणी रशियन ऑलिम्पिकपटूला अटक; रशियाचा माजी पोलीसही अटकेत

पणजी; पुढारी वृत्तसेवा : जागतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या गोव्यामध्ये शनिवारी (दि. 29) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने अमली पदार्थ विक्री करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. यात रशियन ऑलिम्पिकपटूसह एका रशियन माजी पोलीस शिपायाला अटक केली. या कारवाईत अमली पदार्थ आणि विदेशी चलनासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई मुंबईस्थित एनसीबीच्या पथकाने उत्तर गोवा जिल्ह्यातील हरमल येथे शनिवारी पहाटे केली. या कारवाईत 1980 ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला जलतरणपटू स्वेतलाना वर्गानोव्हा हिच्यासह रशियाचा माजी पोलीस शिपाई या परदेशींसह आकाश नावाच्या स्थानिकाला अटक झाली. कारवाईत अमलीपदार्थासह 1829 युएस डॉलर्स, 1720 थाय बात व इतर देशाचे चलन मिळून भारतीय चलना 4.88 लाख रुपये व पाण्यावर अमली पदार्थ पिकवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

एनसीबीच्या गोवा विभागाने गेल्या दोन आठवड्यांच्या टेहाळणीनंतर ही कारवाई केली आहे. मांद्रेतील हरमल व जवळच्या परिसरात रशियन ड्रग कार्टेल सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. गोपनीय माहितीनुसार, एस. वर्गानोवाला नावाची एक रशियन महिला ड्रग्ज व्यवहारात गुंतलेली दिसून आली. तपासा दरम्यान सदर महिलेला आकाश नावाचा स्थानिक युवक मदत करत असल्याचे कळताच पथकातील सदस्यांनी आकाशवर पाळत ठेवली आणि त्याचा माग काढतानाच व्यापक मोहिमेनुसार आंद्रे नावाच्या रशियन नागरिकाला पकडण्यात आले. त्याच्याकडून 20 एलएसडी ब्लॉट्स जप्त करण्यात आले. त्याचा जबाब घेतल्यानंतर त्याने भाड्याने घर घेऊन हायड्रोपोनिक तण उगवत असल्याचे उघड केले. त्यानंतर त्याच्या घरातून हायड्रोपोनिक तणांच्या झाडाची भांडी जप्त करण्यात आली.

विविध प्रकारचे अमलीपदार्थ जप्त

या कारवाई दरम्यान संशयितांकडून 88 एलएसडी ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 242.5 ग्रॅम चरस, 1.440 किलो हायड्रोपोनिक विड, 16.49 ग्रॅम हॅश ऑईल, 410 ग्रॅम हॅश केक यासह विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने भारतीय आणि विदेशी चलन, बनावट कागदपत्रे, ओळखपत्र आणि हायड्रोपोनिक तण वाढवण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त केले आहे.

स्वेतलाना ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती

अटक करण्यात आलेली रशियन महिला एस वर्गानोव्हा हिने 1980 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरणात रौप्यपदक प्राप्त केले आहे. आंद्रे हा रशियाचा माजी पोलिस कर्मचारी आहे.

विविध शहरांमध्ये ड्रग्ज पोहोचविण्याचा प्रयत्न

आंद्रे हा अनेक दिवसांपासून गोव्यात अमलीपदर्थ विक्रीचे रॅकेट चालवत होता. त्याचा प्रसार करण्यासाठी त्याने अनेक शहरांना भेटी दिल्या होत्या. ड्रग्ज सर्वत्र पोचवण्यासाठी तो नियोजन करत होता, असे एनसीबीच्या अधिकार्‍यांने सांगितले.

Back to top button