बंगळूर; पुढारी ऑनलाईन : टाटा आयपीएल २०२२ (TATA IPL 2022) चा लिलाव नुकताच बंगळूर येथे पार पडला. यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या स्पर्धेकडे लागल्या आहेत. पण आयपीएलचा लिलाव संपून दोन दिवस होत नाहीत तोच रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा एक स्टार खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबी (RCB) संघ कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर टाकेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच आरसीबी (RCB) संघासमोर एक नवी समस्या उभी ठाकली आहे.
आयपीएल २०२२ (IPL2022) सुरू होण्यास काही महिनेच उरले आहेत, मात्र आता त्याआधीच आरसीबी (RCB) संघाला मोठा झटका बसला आहे. आरसीबीकडून (RCB) खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे. ग्लेन मॅक्सवेल पुढील महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, त्यामुळे तो पाकिस्तान दौरा आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडणार आहे
मॅक्सवेलने (glenn maxwell) एका इंग्रजी क्रीडा वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला की, स्पर्धांच्या वेळापत्रकातील बदलांमुळे तारखांची टक्कर होणे निश्चितच होते. आरसीबीने (RCB) विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्याशिवाय मॅक्सवेलला रिटेन केले होते. कॅनबेरा येथे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यानंतर तो म्हणाला, 'सुरुवातीला जेव्हा मी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत तारखांवर चर्चा केली तेव्हा दोन आठवड्यांचे अंतर होते, ज्यामध्ये मला वेळ मिळण्याची शक्यता होती. म्हणून जेव्हा मी तारखांचा अंतिम निर्णय घेतला तेव्हा मला आनंद झाला की, मला कोणतीही मालिका चुकवावी लागणार नाही. यानंतर गेल्या वर्षी मी (cricket australia) कॉन्ट्रॅक्ट मीटिंगला आलो तेव्हा त्यांनी सांगितले की पाकिस्तानविरुद्ध मालिका होणार आहे. आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर मर्यादित षटकांच्या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा २९ मार्चपासून सुरू होईल.
मॅक्सवेलने मार्च २०२० मध्ये त्याची भारतीय वंशाची मैत्रीण विनी रमनसोबत भारतीय रितीरिवाजांनुसार साखरपुडा केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅक्सवेल आणि विनीचे लग्न पारंपारिक तमिळ ब्राह्मण पद्धतीने होणार आहे आणि अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे या समारंभाला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. हा लग्न सोहळा २७ मार्चला आयोजित केला आहे.