Latest

पोस्टाच्या ‘या’ योजनामध्ये करा गुंतवणूक : जाणून घ्या सविस्तर Post Office Saving Scheme

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या सुरक्षित भविष्यासाठी अनेक जण आपल्या मिळकतीतून काही रक्कमेची बचत करतात. परंतु पैसे गुंतवणूक करताना खात्रीशीर कोणते पर्याय उपल्बध आहेत. याबाबत गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण असते. कारण कुठे आणि किती पैसे गुंतवणूक करावे, याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातही बचतीचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या बचत योजना (Post Office Saving Scheme)  लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. कारण पोस्टच्या योजनांना केंद्र सरकारची हमी असते. त्याचबरोबर पोस्टाच्या योजनामध्ये गुंतवणुकीवर व्याजही इतरांच्या तुलनेत अधिक मिळते. पोस्टाच्या अशाच काही योजनांची माहिती जाणून घेऊया.

१५ वर्ष मुदतीचे पीपीएफ खाते (Post Office Saving Scheme)

पीपीएफ खात्यामध्ये एका वर्षामध्ये कमीतकमी ५०० रूपये ते जास्तीतजास्त १ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. यावर ७.१ टक्के व्याज मिळते. याची मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असतो. हा कालावधी वाढवताही येतो. यामध्ये सेक्शन ८० सी नुसार सवलत मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची ५ वर्षांची मॅच्युरिटी असते. यामध्ये ७ टक्के व्याज मिळते. यामध्ये १००, ५००, १ हजार, ५ हजार आणि १० हजार रूपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर कर्जही मिळू शकते.

सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकारने मुलींसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ७.६ टक्के व्याज मिळते. या योजनेमध्ये १० वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. मुलगीचे शिक्षण, विवाहासाठी पैशांच्या तरतूद या योजनेमधून करता येते. ही योजना लोकप्रिय झाली असून पालकांचा चांगला प्रतिसाद आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Post Office Saving Scheme)

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो. या योजनेत १ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. तर १५ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. या योजनेमध्ये ८ टक्के व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या ५५ ते ६० वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिस दरमहा उत्पन्न योजना खाते

या योजनेत १५०० रुपयांपासून जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यावर दरवर्षी ७.१ टक्के व्याज मिळते. तर संयुक्त खात्यामध्ये ९ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT