पुढारी ऑनलाइन डेस्क : Justice For Jaahnavi : युनायटेड स्टेट्समधील सिएटल येथे रस्ता ओलांडत असताना पोलिसांच्या कारने धडक दिल्याने जाह्नवी कंदुला या भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यू झाला. मात्र, याची यूएस पोलिसांकडून थट्टा करण्यात आली. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान भारतीय दुतावासाने घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
इंडिया टुडेने याची माहिती दिली आहे. याप्रकरणी सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, भारतीय विद्यार्थिनी जाह्नवी कंदुला हिचा रस्ता अपघातात झालेल्या मृत्यूची हाताळणी "खूपच त्रासदायक" होती आणि त्यांनी या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी बुधवारी या घटनेला आणि पोलिसांच्या प्रतिक्रियेचा व्हायरल झालेला व्हिडिओ "खूप त्रासदायक" असल्याचे म्हटले आहे. वाणिज्य दूतावास आणि दूतावास या प्रकरणाचा सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे बारकाईने पाठपुरावा करत राहील," असेही त्यांनी म्हटले आहे.
जान्हवी कंदुला हिचा जानेवारी महिन्यात सिएटल येथे रस्ता ओलांडताना गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. केव्हिन डेव्ह असे कार चालक पोलिसाचे नाव होते. सिएटल टाईम्सच्या मते, पोलिस तपास अहवालाचा हवाला देऊन, कार चालवणारा अधिकारी 74 mph (119 kmph) वेगाने जात होता आणि पदवीधर विद्यार्थीनीचे शरीर 100 फूट (30 मीटर) पेक्षा जास्त फेकले गेले.
घटनेनंतर डॅनियल ऑडरर या अधिकाऱ्याला तपासणीसाठी बोलावण्यात आले.
यावेळी तपासणी दरम्यान त्याच्या बॉडी कॅमेऱ्याने सहकाऱ्याला केलेल्या कॉलचा ऑडिओ रेकॉर्ड केला. यामध्ये अधिकाऱ्याने केलेली टिप्पणी त्रासदायक आहे. त्याने अपघातातील मयत विद्यार्थीनीबाबत म्हटले की, याची फार काही किंमत नाही शहराने फक्त एक चेक लिहावा, असे म्हणत त्याने खिल्ली उडवली. तसेच जोरजोरात हसला. तसेच कार चालवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची काही चूक होती का किंवा याचा गुन्हेगारी तपास आवश्यक होता का असा कोणताही अहवाल त्याने दिला नाही. Justice For Jaahnavi
ही व्हिडिओ क्लिप पोलिसांनी जारी केली होती. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'X' वर हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची अशा प्रकारे थट्टा केल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 23 वर्षीय जाह्नवी कंदुला ही भारतीय विद्यार्थीनी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीत शिकणारी विद्यार्थीनी होती. 'X' वर Justice For Jaahnavi, Jaahnavi@SeattlePD, US Cop Mocking असा ट्रेंड तिला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झाला आहे.
हे ही वाचा :