Latest

Indian Navy | जहाजासोबत बुडाले ३९ लोक, चीनने मागितली मदत, भारतीय नौदल मदतीला धावले!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय नौदलाने (Indian Navy) बुडालेल्या चिनी मासेमारी जहाजातून ३९ कर्मचाऱ्यांना वाचवण्यास मदत केली आहे. १७ मे रोजी भारतापासून अंदाजे ९०० सागरी मैल अंतरावर असलेल्या हिंद महासागर क्षेत्रामध्ये (IOR) एका बुडणाऱ्या चिनी मासेमारी जहाजातून ३९ क्रू मेंबर्सची सुटका केल्याचे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले आहे. नौदलाने प्रतिकूल हवामान असतानाही अनेक ठिकाणी शोधकार्य केले आणि बुडालेले जहाज शोधून काढले. भारतीय नौदलाने बचावकार्यादरम्यान सर्वोतोपरी मदत केली. त्यांनी चीनच्या नौदलाच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून आपली संसाधने तैनात केली. चीनच्या विनंतीवरून भारतीय नौदलाने बुधवारी त्यांचे विमान P8I तात्काळ पाठवले.

"१७ मे रोजी ३९ क्रू मेंबर्स असलेले चीनी मासेमारी जहाज लू पेंग युआन यू ०२८ बुडाल्यानंतर मानवतावादी दृष्टीकोनातून भारतीय नौदलाने वेगाने मदतकार्य हाती घेतले. त्यासाठी भारतीय नौदलाने भारतापासून सुमारे ९०० सागरी मैल अंतरावर दक्षिणेकडील हिंद महासागर क्षेत्रामध्ये त्यांची Air MR यंत्रणा तैनात केली. मासेमारी जहाजावर चीन, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समधील नागरिकांचा समावेश होता," अशी माहिती नौदलाने ट्विट करत दिली आहे.

"P8I विमानाने प्रतिकूल हवामान असूनही अनेक ठिकाणी मासेमारी जहाजाचा शोध घेतला आणि यादरम्यान बुडालेल्या जहाजाशी संबंधित अनेक वस्तू सापडल्या. या घटनेनंतर तात्काळ मदत म्हणून चिनी नौदलाच्या विनंतीवरून भारतीय विमानाद्वारे घटनास्थळी SAR उपकरणे तैनात करण्यात आली.

"समुद्रात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक विश्वासार्ह आणि जबाबदार म्हणून भारतीय नौदलाच्या युनिट्सनीदेखील परिसरातील इतर युनिट्ससोबत शोध आणि बचावकार्यासाठी समन्वयाने काम केले. भारतीय नौदल सध्या सुरू असलेल्या शोध आणि बचाव प्रयत्नांना शक्य तितकी मदत देण्यासाठी तैनात आहे," असे परराष्ट्र कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत पुढे म्हटले आहे. (Indian Navy)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT