Latest

Rohit Sharma Injured : रोहित शर्मा आफ्रिका दौ-यातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

रणजित गायकवाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, रोहितच्या पायाचे स्नायू ताणले गेले आहेत. गुजरातचा 31 वर्षीय सलामीवीर प्रियांक पांचाळ याला रोहितच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. भारत अ संघासोबत प्रियांक सध्या दक्षिण आफ्रिकेतच खेळत आहे.

आफ्रिका दौर्‍यासाठी निवडलेल्या कसोटी संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि सोमवारपासून ते तीन दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत. मात्र, याआधी त्यापैकी काही खेळाडूंनी कसून सराव केला. सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली आणि त्यामुळेच त्याचे आता कसोट मालिकेत खेळणे रद्द झाले आहे. कसोटी मालिकेनंतर कदाचित तो वनडे मालिकेत खेळू शकेल.

रोहितची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का असणार आहे. 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच, नुकतीच त्याची कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून निवड केली गेली आहे. 2019 च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकपासून रोहितचे कसोटीत सलामीला प्रमोशन झाले. त्यानंतर त्याने 16 कसोटीत 58.48 च्या सरासरीने 1,462 धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे.

रोहित वेदनेने ओरडताना दिसत होता… (Rohit Sharma Injured)

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, पहिल्यांदा नेटमध्ये अजिंक्य रहाणेने ४५ मिनिटे फलंदाजी केली. रहाणेनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma Injured) सरावासाठी आला. यादरम्यान चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर आदळला. त्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर काही खेळाडू त्याच्याकडे धावले. यावेळी वातावरण चिंताग्रस्त झाले होते, अशी माहिती मिळते. रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करत आहेत. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत या सर्व खेळाडूंचा संघात सहभाग नव्हता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने वनडे संघाच्या कर्णधार पदावरून मोठा निर्णय जाहीर केला. विराट कोहलीची उचलबांगडी करून त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधार करण्यात आले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच वनडे संघाच्या कर्णधार पदाची माळ रोहितच्या गळ्यात पडली. वनडे संघाचा कर्णधार म्हणून रोहितचा हा पहिलाच दौरा आहे. (Rohit Sharma Injured)

टीम इंडियाला २६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिली कसोटी खेळायची आहे. म्हणजेच त्याच्याकडे फक्त दोन आठवड्यांचा वेळ आहे. पहिल्या कसोटीत तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर केएल राहुल कसोटीत मयंक अग्रवालसोबत सलामी करू शकतो. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मयंक जबरदस्त फॉर्ममध्ये होता. मुंबई कसोटीत त्याने शानदार शतक झळकावले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT