Latest

INDvsPAK Asia Cup : भारत-पाक सामन्यात ‘हे’ 3 विक्रम मोडणार! रोहित शर्मावर असेल खास नजर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsPAK Asia Cup : आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. हा महामुकाबला 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात असे तीन मोठे विक्रम होऊ शकतात, ज्यावर भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

शतकांच्या बाबतीत धोनीचा विक्रम मोडणार

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आतापर्यंत एकूण 132 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारतीय संघाने 55 जिंकले आहेत आणि 73 गमावले आहेत. तर चार सामन्यांचे निकाल लागलेच नाहीत. या सर्व सामन्यातील दोन्ही संघांचे रेकॉर्ड बघितले तर, भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट यांनी प्रत्येकी सर्वाधिक 5 शतके फटकावली आहेत. त्यांच्या खालोखाल 3 खेळाडू असे आहेत ज्यांनी 4-4 शतके झळकावली आहेत. (INDvsPAK Asia Cup)

रोहित-विराटच्या नावावर 2-2 शतके

सचिन व्यतिरिक्त एकाही भारतीयाला पाकिस्तानविरुद्ध दोनपेक्षा जास्त शतके झळकावता आलेली नाहीत. सध्याचे स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनाही अशी किमया साधतात आलेली नाही. दोघांच्याही नावावर 2-2 शतके आहेत. पण या दोघांपैकी कुणीही आशिया चषकातील सामन्यात शतक पूर्ण केल्यास तो एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध दोनपेक्षा जास्त शतके करणारा सचिननंतरचा दुसरा भारतीय ठरेल. (INDvsPAK Asia Cup)

कोहली आणि रोहितकडे दिग्गजांना मागे टाकण्याची संधी

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni), सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), राहुल द्रविड (Rahul Dravid), मोहम्मद अझरुद्दीन आणि नवज्योतसिंग सिद्धू यांनीही पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन शतके झळकावली आहेत. या माजी खेळाडूंना मागे टाकण्याची सुवर्णसंधी कोहली आणि रोहितकडे आहे.

बुमराहकडे कुंबळेचा विक्रम मोडण्याची संधी

दुखापतीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मोठा विक्रम करण्याची संधी आहे. खरं तर, एकदिवसीय आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा अव्वल स्थानी आहे. त्याने 4 सामन्यांत 15 बळी घेतले आहेत. तर भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे (Anil Kumble) पाचव्या क्रमांकावर आहे. ज्याने 4 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. (INDvsPAK Asia Cup)

पण कुंबळे हा एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल आहे. सध्या सक्रिय खेळाडूंपैकी बुमराहने 2 सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने पुढच्या सामन्यात आणखी 4 विकेट घेतल्यास, तो कुंबळेचा विक्रम मोडण्याची दाट शक्यता आहे.

रोहित गांगुलीचा 'हा' विक्रम मोडण्याची शक्यता

भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) पाकिस्तानविरुद्धच्या शतक झळकावले तर तो आणखी एक विक्रम आपल्या नावावर करेल. वास्तविक, एकदिवसीय आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू अर्जुन रणतुंगाच्या नावावर आहे. त्याने 13 सामन्यांत 594 धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ भारताचे दोन माजी कर्णधार आहेत. यात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) दुस-या आणि सौरव गांगुली (sourav ganguly) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

धोनीने 14 सामन्यात 579 धावा केल्या होत्या. तर गांगुलीने 9 सामन्यात 400 धावा केल्या होत्या. या यादीत चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. ज्याने आतापर्यंत 5 सामन्यात 317 धावा केल्या आहेत. रोहितने 83 धावा केल्या तर तो गांगुलीला मागे टाकेल. अशाप्रकारे, आशिया चषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा भारतीय आणि एकूण तिसरा खेळाडू ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT