पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Record : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 19 षटकार ठोकून इतिहास रचला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी केली. शुबमन गिल, श्रेयस अय्यरने शतकी तर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतके झळकावून कांगारू गोलंदाजीची पिसे काढली. यामुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश आले. भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावा केल्या.
भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 षटकारांचा आकडा गाठला. या सामन्यात भारताने एकूण 19 षटकार ठोकले, जे भारतीय संघाने एका वनडे डावात मारलेल्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार आहेत. भारताने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात सर्वाधिक षटकार मारले होते. (Team India Record)
19 षटकार : विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बंगळूर, 2013
19 षटकार : विरुद्ध न्यूझीलंड : इंदूर, 2023
18 षटकार : विरुद्ध बर्म्युडा : पोर्ट ऑफ स्पेन, 2007
18 षटकार : विरुद्ध न्यूझीलंड : क्राइस्टचर्च, 2009
18 विरुद्ध : विरुद्ध ऑस्ट्रेलिया : इंदूर, 2023
गिलने 97 चेंडूत चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या, तर अय्यरने 90 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 105 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली, जी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये कोणत्याही विकेटसाठी केलेली चौथी सर्वोच्च भागीदारी आहे.
कर्णधार केएल राहुल (38 चेंडूत 52 धावा, तीन चौकार, तीन षटकार) आणि सूर्यकुमार यादव (37 चेंडूत नाबाद 72 धावा, सहा चौकार, सहा षटकार) यांनी अर्धशतके झळकावून भारताला मोठी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरून ग्रीनने दोन विकेट घेतल्या मात्र त्यासाठी त्याने 103 धावा खर्च केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये संघाने बंगळूरमध्ये सहा विकेट्सवर 383 धावा केल्या होत्या.