Latest

IND vs AUS 1st ODI : भारताचा मोहालीत 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : India vs Australia 1st ODI : मोहाली येथे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सर्व गडी गमावून 276 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 48.4 षटकांत 5 बाद 281 धावा करून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 2, पॅट कमिन्स आणि शॉन अॅबॉटने 1-1 विकेट घेतली.

277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी झाली. ऋतुराज गायकवाड 77 चेंडूत 71 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने तीन धावा केल्या. यानंतर शुभमन गिल वैयक्तिक 74 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव 50 धावा करून बाद झाला. कर्णधार केएल राहुलने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 49व्या षटकात शॉन अॅबॉटला षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाईल.

हा सामना जिंकून भारत एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. बिंद्रा स्टेडियमवर भारताने तब्बल 27 वर्षांनंतर कांगारूंचा पराभव केला आहे. याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 1996 मध्ये विजय मिळवला होता.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 10 गडी गमावून 276 धावा केल्या. कांगारू संघाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावा काढल्या. दुसरीकडे, मोहम्मद शमी भारताकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेऊन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. संघाला पहिल्याच षटकात मिचेल मार्शच्या रूपाने धक्का बसला. त्यावेळी त्यांची धावसंख्या अवघी 4 होती. मात्र, यानंतर सलामीवीर वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची (106 चेंडू) भागीदारी करत संघाला मजबूत केले. पण वॉर्नर (52), स्मिथ (41), मार्नस लॅबुशेन (39), कॅमेरॉन ग्रीन (31), मार्कस स्टॉइनिस (31), जोश इंग्लिस (45) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही, त्यामुळे संघाला 276 धावांपर्यंतच मजल मारता आली.

वॉर्नरचे 29 वे अर्धशतक

या सामन्यात वॉर्नरने शानदार फलंदाजी करत महत्त्वपूर्ण खेळी केली. स्मिथसोबतच्या त्याच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 29 वे अर्धशतक ठरले. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 20 शतके झळकावली आहेत. या सामन्यात त्याने 98.11 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 53 चेंडूत 52 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले.

या सामन्यात वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 षटकारही पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो 7वा ऑस्ट्रेलियन आणि एकूण 43वा खेळाडू ठरला. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने 146 डाव खेळले.

भारतीय गोलंदाजांची अशी झाली कामगिरी

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेसन घालण्यात ते यशस्वी ठरले. शमीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत कांगारू फलंदाजांवर दबाव आणला. त्याने 10 षटकात 51 धावा देत 5 बळी घेतले. त्याची एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. यापूर्वी वनडे फॉरमॅटमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी जून 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध झाली होती. त्यावेळी त्याने 69 धावांत 5 बळी घेतले होते. या वेगवान गोलंदाजाने वनडे कारकिर्दीत दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 93 सामन्यांत 25.42 च्या सरासरीने 170 बळी घेतले आहेत.

अश्विनचे 21 महिन्यांनी वनडे संघात पुनरागमन

ऑफस्पिनर अश्विनने आपला शेवटचा वनडे सामना 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. शुक्रवारी त्याने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 47 धावांत 1 बळी घेतला. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 4.70 होता. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे अश्विनला वनडे संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही शानदार गोलंदाजी करत 1 बळी घेतला. रवींद्र जडेजा 1 विकेट घेण्यात यशस्वी झाला.

भारताचा संघ : शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचा संघ : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT