Latest

IND vs WI : अश्विनच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजचा संघ गारद, भारताचा एक डाव आणि 141 धावांनी विराट विजय

Arun Patil

रोसेयो (डॉमिनिका), वृत्तसंस्था : यशस्वी जयस्वालची पदार्पणात केलेली शतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा (IND vs WI) एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात 12 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजला भारताने दुसऱ्या डावात 130 धावांत रोखले. यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात 171 धावांची दमदार खेळी केली. रोहित शर्मानेही शतकी खेळी केली.

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपला पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला. पदार्पणातील शतकवीर यशस्वी जैस्वाल 171 धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आक्रमक फलंदाजी केली. परंतु विराट 76 धावांवर बाद झाल्यावर काही वेळाने भारताने डाव घोषित केला. विंडीजला आता दुसर्‍या डावात 271 धावा करण्याचे आव्हान आहे. रवींद्र जडेजा 37 धावांवर नाबाद राहिला.

भारताने पहिल्याच दिवशी पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळले. त्यानंतर पहिला कसोटी सामना यशस्वी जैस्वालने चांगलाच गाजवला. त्याने भारतासाठी कसोटी पदार्पण करताना शतक झळकावले. त्याच्यासोबत रोहित शर्मानेही शतकी खेळी करून आपणही फॉर्मात परतल्याचे दाखवून दिले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने मजबूत स्थिती प्राप्त केली असून, तिसर्‍या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 4 बाद 400 धावा झाल्या होत्या. भारताकडे यावेळी 250 धावांची भक्कम आघाडी होती. शतकवीर यशस्वी जैस्वाल 171 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली 72 धावांवर खेळत होता. उपाहारानंतर विराट आणि जडेजा यांनी आक्रमक खेळ करण्याच्या सूचना होत्या. विराटने शतकाकडे वाटचाल सुरू केली होती. परंतु 76 धावांवर कॉर्नवालने विराटला बाद केले. त्यानंतर इशान किशन खेळपट्टीवर आला. परंतु त्यानंतरच्या 7 षटकांत फक्त 16 धावाच संघाच्या खात्यात आल्यामुळे भारताने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या 5 बाद 421 धावा झाल्या होत्या. (IND vs WI)

तत्पूर्वी गुरुवारी रोहित शर्मा 103 धावा करून बाद झाला. त्याने कसोटीतील दहावे शतक झळकावले. शुभमन गिलने मात्र निराशा केली. तो 6 धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेही अवघ्या तीन धावांत तंबूत परतला.

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने आपले दीडशतक पूर्ण करून द्विशतकाकडे कूच केली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी देखील रचली. विराट कोहली आपल्या अर्धशतकाजवळ पोहोचला होता. भारताने 350 धावांचा टप्पा पार करून आपले लीड 200 धावांच्या पुढे नेले होते. सर्व फासे भारताच्या बाजूने पडत होते. मात्र अल्झारी जोसेफने यशस्वी जैस्वालला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. त्याने विराट-यशस्वीची 110 धावांची भागीदारी तोडली. याचबरोबर यशस्वी जैस्वालचा पदार्पणाच्या कसोटीत द्विशतकी खेळी करण्याचा मनसुबा उधळून लावला. यशस्वीचे पदार्पणातच द्विशतक झळकावण्याचे स्वप्न भंगले. त्याने 387 चेंडूंत 171 धावा केल्या.

याचदरम्यान, भारताचा रनमशिन विराट कोहलीने आपले 29 वे अर्धशतक पूर्ण केले असून, अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजासोबत आक्रमक भागीदारी रचली. उपाहाराला भारताच्या 4 बाद 400 धावा झाल्या होत्या.

हेही वाचा…

SCROLL FOR NEXT