नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उंचावत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,४५१ नवे रुग्ण आढळून आले, तर ५४ जणांचा मृत्यू झाला. सध्या देशात कोरोनाचे १४,२४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, दिवसभरात १,५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल (दि.२१) देशात कोरोनाच्या ४ लाख ४८ हजार ९३९ चाचण्या करण्यात आल्या होत्या.
याआधी बुधवारी दिवसभरात २ हजार ३८० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर, ५६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान १ हजार २३१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५३ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८७ कोटी २६ लाख २६ हजार ५१५ डोस देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून २ कोटी ५९ लाख ६९ हजार ८१६ बूस्टर डोस देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत १९२ कोटी २७ लाख २३ हजार ६२५ डोस देण्यात आले असून यातील २० कोटी १६ लाख ९१ हजार २२० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी ३३ लाख ७७ हजार ५२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ४९ हजार ११४ तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
देशातील ९ राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या जिल्ह्यांचा कोरोना संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. दर १०० नागरिकांमागे ५ कोरोनाबाधित आढळत असल्याचे रुग्णसंख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.
केरळमध्ये १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. या जिल्ह्यांचा कोरोना संसर्गदर १४ ते ३१.६४ टक्के नोंदवण्यात आला आहे. तर, मिझोरममधील ८ जिल्ह्यांमध्ये कोरोनासंसर्गदर अधिक नोंदविण्यात आला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर, एका जिल्ह्याचा कोरोनासंसर्गदर ६.८७ टक्के नोंदवण्यात आला आहे. १३ ते १९ एप्रिल दरम्यानच्या या अहवालानूसार मणिपूर आणि मेघालय मधील प्रत्येकी २ तसेच अरुणाचल प्रदेशातील एका जिल्ह्यातील कोरोनास्थिती चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे.
राजधानी दिल्लीत देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यातील दक्षिण (७.८२ टक्के) , पश्चिम (६.३० टक्के), दक्षिण-पश्चिम (५.७८ टक्के), उत्तर-पश्चिम (५.७५ टक्के) आणि पुर्व दिल्लीचा कोरोनासंसर्गदर ५.३६ टक्के नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडात १०.६१ टक्के, हरियाणातील गुरूग्राममध्ये ११.०७ टक्के, फरीदाबाद चा कोरोनसंसर्गदर ७.१९ टक्के नोंदवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश मधील किन्नोर जिल्ह्यांचा कारोनासंसर्गदर ६.८२ टक्के नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.