Latest

इंडिया आघाडीकडे फक्त भारत तोडण्याचे काम : राज्यमंत्री रामदास आठवले

अनुराधा कोरवी

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : आपण योग्य दिशेने पुढे चाललो आहे. त्यामुळे तरुणांनी माझ्यासोबत यावे. भाजपासोबत असलो तरी किमान समान कार्यक्रमावर युती केली आहे. एकट्याच्या ताकदीवर सत्तेत येणे शक्य नसेल तर मित्र पक्षाच्या ताकदीवर पुढे आले पाहिजे. इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचे काम करते. भारत जोडो यात्रा काढत भारत तोडत आहे. भाजपमध्ये परिवर्तन झाले आहे. आता भाजप बदलला आहे. भाजप हा सर्व जाती, धर्म आणि पंथांचा पक्ष आहे. त्यामुळे संविधान बदलेल ही अफवा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात कॅबिनेटसह राज्यात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले आहे. नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास देखील आठवले यांनी व्यक्त केला आहे. डोंबिवलीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते.

संबंधित बातम्या 

डोंबिवलीत रविवारी राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. या संदर्भात बोलताना आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता.

एकनाथ शिंदे यांना अडचण निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिले होते. 2026 ला माझी राज्यसभा संपत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहे, आता कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले

वंचितचा निर्णय योग्यच

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमधून जवळपास बाहेर पडल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचा हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. वंचितने काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांना महाविकास आघाडीला पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

बच्चू कडू यांची समजूत काढू

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. या संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी याआधीही असे अनेक विषय मिटवले आहेत. हा विषय मिटावा म्हणून मी स्वतः बच्चू कडू यांच्याशी बोलणार आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असेही आठवले म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT