Latest

WTC Final Ind vs Aus : भारत ३ बाद १६४; पाचव्या दिवशी २८० धावांचे आव्हान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला 444 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या डावात 3 विकेट्स गमावत १६४ धावा केल्या आहेत. अजूनही भारताला अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी ५ व्या दिवशी २८० धावा काढण्याची गरज असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. पण याचवेळी गिल 18 धावा करून बाद झाला. त्याला कॅमेरून ग्रीनच्या हाती स्कॉट बोलँडने झेलबाद केले. यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने काहीकाळ फलंदाजी केली. मात्र, नेथन लायनने रोहित शर्माला आणि पॅट कमिंसने चेतेश्वर पुजाराला बाद करुन भारताला दोन मोठे धक्के दिले.  भारताला रोहित शर्माच्या  20व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नॅथन लायनने एलबीडब्ल्यू आऊट केले. रोहित रिव्ह्यूसाठी गेला पण काही उपयोग झाला नाही. त्याने 7 चौकार आणि 1 षटकारासह 60 चेंडूत 43 धावांची खेळी खेळली. भारताची तिसरी विकेट चेतेश्वर पुजाराच्या रुपात पडली. 21व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो कमिन्सच्या हाती कॅरीच्या हाती झेलबाद झाला. पुजाराने 47 चेंडूंत 5 चौकारांसह 27 धावा केल्या. दरम्यान, यानंतर भारताचा डाव विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला आहे. विराट कोहली ६० चेंडूमध्ये ४४ धावा करुन क्रिजवर टिकून आहे. तर अजिंक्य रहाणेने विराट कोहलीला साथ देत ५९ चेंडूमध्ये २० धावा केल्या आहेत.

270 वर कांगारूंचा डाव घोषित

270 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट पडली. कर्णधार पॅट कमिन्स पाच चेंडूत पाच धावा करून बाद झाला आहे. मोहम्मद शमीने त्याला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. यासह ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव घोषित केला. दुसऱ्या टोकाला अॅलेक्स कॅरी 66 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. या पार्श्वभूमीवर भारतासमोर 444 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. शमी आणि उमेशला प्रत्येकी दोन बळी मिळाले. सिराजने एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट

260 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट पडली. मिचेल स्टार्क 57 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. स्टार्कने आपल्या खेळीत सात चौकार मारले.

ऑस्ट्रेलियाच्या एकूण आघाडीने 400 धावांचा टप्पा पार केला

ऑस्ट्रेलियाच्या एकूण आघाडीने 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या डावात कांगारू संघाने 173 धावांची आघाडी घेतली होती तर दुसऱ्या डावात सहा गडी गमावत 229 धावा करताच त्यांच्या आघाडीने 400 धावांचा टप्पा पार केला. आता या विशाल लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघ कसा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अॅलेक्स कॅरीचे अर्धशतक

अॅलेक्स कॅरीने 82 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मिचेल स्टार्कच्या साथीने संघाला आणखीन मजबूत स्थितीत पोहचवले. या जोडीने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

लॅबुशेन 41 धावा करून बाद

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 124 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मार्नस लॅबुशेन 126 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. उमेश यादवने त्याला चेतेश्वर पुजाराकडून झेलबाद केले. अॅलेक्स कॅरी आता कॅमेरून ग्रीनसह क्रीजवर आहे.

सामन्यात आतापर्यंत काय घडले…

भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने रोहितचा निर्णय योग्य ठरवत चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का दिला. त्याने उस्मान ख्वाजाला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. ख्वाजाला खातेही उघडता आले नाही. दोन धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने मार्नस लॅबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. उपाहाराआधी वॉर्नरला शार्दुल ठाकूरने यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद केले. तो 60 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 43 धावा करून बाद झाला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून 73 धावा केल्या होत्या.

उपाहारानंतर मोहम्मद शमीने मार्नस लॅबुशेनला क्लीन बोल्ड केले. तो 62 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. 24.1 षटकात लॅबुशेनची विकेट पडली. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी जबरदस्त फलंदाजी करत दिवसभरात एकही विकेट पडू दिली नाही आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गडी बाद 327 पर्यंत पोहचवली. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी 142 धावा जोडून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड 163 धावांवर बाद झाला. तर स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले. तो 121 धावा करून बाद झाला. कॅमेरून ग्रीन सहा धावांवर, अॅलेक्स कॅरी 48 धावांवर, मिचेल स्टार्क पाच धावांवर, पॅट कमिन्स नऊ धावांवर आणि लियॉन नऊ धावांवर बाद झाले. भारताकडून सिराजने चार विकेट घेतल्या. शमी आणि शार्दुलला प्रत्येकी दोन बळी मिळाले. जडेजाने एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांना प्रत्युत्तर देताना भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा 15, शुभमन गिल 13, चेतेश्वर पुजारा 14, विराट कोहली 14 धावा करून बाद झाला. 71 धावांपर्यंत भारताने चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर रवींद्र जडेजा आणि रहाणेने पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. ऑफस्पिनर नॅथन लायनने ही जोडी फोडली. त्याने स्लिपमध्ये जडेजाला 48 धावांवर झेलबाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून 151 धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला श्रीकर भरत पाच धावांवर बाद झाला, पण अजिंक्य रहाणे आणि शार्दुलने शतकी भागीदारी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले. रहाणे 89 आणि शार्दुल 51 धावा करून बाद झाला. यानंतर भारताचे तळातील फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत आणि त्यांचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. कर्णधार कमिन्सने तीन बळी घेतले. स्कॉट बोलँड, मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. नॅथन लायनने एक विकेट घेतली.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. डेव्हिड वॉर्नर एक धाव काढून सिराजचा बळी ठरला. यानंतर उमेशने 13 धावा करून ख्वाजालाही बाद केले. यानंतर स्मिथ आणि लबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली, मात्र जडेजाने स्मिथला बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर त्याने ट्रॅव्हिस हेडलाही बाद केले. तिस-या दिवसाअखेर लॅबुशेन 41 आणि ग्रीन सात धावा करून क्रीजवर होते. यासह ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 123 होऊन त्यांच्या खात्यात 296 धावांची आघाडी जमा झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT