पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या श्रीलंकेचा दारून पराभव केला. आज दुपारी मालिकेतील दुसरा व शेवटचा सामना बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. (IND vs SL 2nd TEST)
या सामन्यात टीम इंडिया श्रीलंकेला पराभूत करून मालिका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. तर श्रीलंका मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिका २-० ने जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. आजपासून (१२ मार्च) बंगळूरमध्ये दुपारी २ वाजता दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे.
हा कसोटी सामना दिवस-रात्र स्वरूपात असेल, हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि २२२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामनाही जिंकून भारताला श्रीलंकेचा कसोटी मालिकेत २-० असा धुव्वा उडवायचा आहे. या सामन्यात स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दोन मोठे विक्रम करू शकतो. (IND vs SL 2nd TEST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दिवस-रात्र कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा दोन मोठे विक्रम करू शकतो. अष्टपैलू रवींद्र जडेजाने आतापर्यंत ५८ कसोटी सामन्यांमध्ये ५४१ बळी घेतले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने आणखी 9 विकेट घेतल्या तर तो अनेक दिग्गजांना मागे टाकू शकतो. भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत जडेजा बी. एस. चंद्रशेखरला मागे टाकू शकतो. चंद्रशेखरने ५८ कसोटी सामन्यात २४२ विकेट घेतल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत रवींद्र जडेजाने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने आपल्या फलंदाजीने मोठमोठ्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रात धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. या सामन्यात जडेजाकडे सामन्यात २५०० धावा पूर्ण करण्याचीही संधी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५८ कसोटी सामन्यांमध्ये २३७० धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत. बंगळूर कसोटीत त्याने १३० धावा केल्या तर तो या विक्रमाला गवसणी घालू शकतो. तो केएल राहुलचा सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रमही मोडू शकतो. राहुलने ४३ सामन्यात २५४७ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला जडेजा रूपात आक्रमक अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, ज्यामुळे सर्व संघाचे धाबे दणाणले आहेत. आपल्या वेगवान फिरकीने व गोलंदाजीने जडेजा किलर गोलंदाजी करण्यात तो पारंगत आहे. तो वेगवान गोलंदाजी करत षटक कमी वेळात संपवतो. ज्यामुळे फलंदाजांना त्याचे चेंडू पटकन समजत नाहीत. चेंडू न समजल्याने फलंदाज पटापट बाद होतात. फलंदाजीच्या क्रमवारीत खेळताना तो धोकादायक फलंदाजीतही करण्यात निष्णात आहे.
तो क्षेत्ररक्षणातही उत्तम निपुण आहे, क्षेत्ररक्षण करताना तो विकेटवर असा चेंडू फेकतो जणू एखादा नेमबाजचं विकेटवर निशाणा साधतो. विरोधी संघाचे गोलंदाज त्याच्या फलंदाजीला घाबरतात, हे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले. मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने नाबाद १७५ धावांचा डोंगर उभारला होता. यासह त्याने सामन्यात गोलंदाजी करताना दोन डावात मिळून श्रीलंकेच्या ९ गड्यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला होता.