Latest

IND vs PAK : श्रीलंका दौर्‍यावर बहिष्कार टाकण्याची पाकिस्तानची धमकी

Shambhuraj Pachindre

कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक 2023 हातातून जाऊ देण्याच्या तयारीत नाही. बीसीसीआयने पाकिस्तानात होणार्‍या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाठवणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली. त्यामुळे पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी उठल्यासुटल्या बेताल वक्तव्य करत आहेत. भारतात होणार्‍या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा वापरूनही बीसीसीआयने भीक न घातल्याने आता पाकिस्तान बोर्डाने मोर्चा श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे वळवला आहे. त्यांनी आगामी श्रीलंका दौर्‍यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. (IND vs PAK)

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद स्वतःकडे राहण्यासाठी पीसीबीने हायब्रिड मॉडेल सुचविले. त्यानुळे भारताचे सामने तटस्थ ठिकाणी आणि अन्य संघांचे पाकिस्तानात असा पर्याय होता. पण, बीसीसीआयसह श्रीलंका व बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही त्याला विरोध दर्शवला. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रक्षेपक कंपन्याही या मॉडेलसाठी फारशा उत्सुक नाहीत. कारण त्यांना एकावेळेला दोन्ही देशात सेटअप उभा करावा लागेल. आता पीसीबीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला जुलैमध्ये श्रीलंकेत होणार्‍या दोन कसोटी सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. तेथील स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान श्रीलंकेत होणार्‍या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. श्रीलंकेने आशिया चषकसाठी पीसीबीच्या हायब्रिड मॉडेल नकार दिला आणि त्यामुळे पाकिस्तान त्याचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता श्रीलंका दौर्‍यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेटचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. परंतु पीसीबीने श्रीलंकेचा नकार नम्रपणे घेतला नाही. कसोटी मालिकेवर बहिष्कार टाकल्यास एसएलसीवर गंभीर परिणाम होईल. श्रीलंका अजूनही आर्थिक संकटातून सावरत आहे. तथापि, आशिया चषक देशात हलवल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेच्या भवितव्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केल्यास भारत सहभागी होणार नाही. श्रीलंका आणि बांगलादेश यूएईला आपले संघ पाठवण्यास तयार नाहीत. पाकिस्तानशिवाय आशिया चषकाचे यजमानपदासाठी श्रीलंका हा पर्याय समोर आला आहे. (IND vs PAK)

हेही वाचा; 

SCROLL FOR NEXT