Latest

IND VS NZ ODI : न्‍यूझीलंड ‘मोहीम’ फत्ते! टीम इंडियाचा ८ विकेट्स राखून विजय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि न्यूझीलंड वन-डे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (दि.21) रायपूर येथे झाला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टीम इंडियाने न्‍यूझीलंडला १०८ धावांमध्‍ये गुंडाळले. यानंतर २०.१  षटकांमध्‍ये २ गडी गमावत १०९ धावांचे लक्ष्‍य पूर्ण करत टीम इंडियाने सामना जिंकला तसेच वन-डे मालिकाही २-0 अशी आपल्‍या नावावर केली. (IND VS NZ ODI)

२१व्‍या षटकात टीम इंडियाचा विजयावर शिक्‍कामोर्तब

भारतीय गोलंदाजांच्‍या भेदक मार्‍यासमोर न्‍यूझीलंडचा डाव १०८ धावांवर आटोपला. विजयासाठी १०९ धावांच्‍या लक्ष्‍याचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्‍या पाच षटकांमध्‍ये संयमित खेळीचे प्रदर्शन घडवले. (IND VS NZ ODI)

रोहित शर्माचे दमदार अर्धशतक

प्रारंभीची काही षटके संयमित फलंदाजी केल्‍यानंतर रोहितला लय गवसली. त्‍याने सात चौकार आणि दोन षटकार फटकावत ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दमदार अर्धशतकी खेळीनंतर १५ व्‍या षटकात एच. शिपले याने रोहित शर्माला पायचीत केले. यानंतर १९ व्‍या षटकांमध्‍ये ११ धावांवर खेळणार्‍या विराट कोहलीला मिचेल सँटनरने बाद केले. त्‍याने ९ चेंडूत दोन चौकाराच्‍या सहाय्‍याने ११ धावा केल्‍या. सलामीवीर शुभमन गिल याने ४० धावांचे तर इशान किशन ८ धावांचे योगदान देत २०.१  षटकांमध्‍ये १०९ धावांचे लक्ष्‍य पूर्ण केले. तीन सामन्‍याच्‍या वन-डे मालिकेत टीम इंडियाने सलग दुसरा विजय नोंदवत मालिकेवर कब्‍जा केला. (IND VS NZ ODI)

भारत आणि न्यूझीलंड वन-डे मालिकेमध्‍ये मागील ३४ वर्ष टीम इंडियाचा दबदबा कायम आहे. १९८८ पासून भारताने सलग सहा वनडे मालिका जिंकल्‍या आहेत. आता सलग सातवी मालिकाही आपल्‍या नावावर करण्‍यात टीम इंडियाला यश मिळाले आहे.

१५ धावांमध्‍ये न्‍यूझीलंडचा निम्‍मा संघ तंबूत, १०८ धावांवर डाव आटोपला

पहिल्‍याच षटकाच्‍या पाचव्‍या चेंडूवर न्‍यूझीलंडला पहिला धक्‍का बसला. मोहम्‍मद शमीने सलामीवीर फिन ऍलन याला शून्‍यवर बोल्ड (त्रिफळाचीत) केले. पाच षटकांच्‍या खेळानंतर न्‍यूझीलंडने १ गडी गमावत ८ धावा केल्‍या. सहाव्‍या षटकामध्‍ये मोहम्‍मद सिराज याने हेन्री निकोल्सला याला स्‍लिपमध्‍ये झेल देण्यास भाग पाडले. शुभमन गिलने झेल टिपत २ धावांवर खेळणार्‍या निकोल्‍सला बाद केले.

यानंतरच्‍या पुढील सातव्‍या शतकात शमीने आपल्‍याच गोलंदाजीवर डॅरेल मिशेलला झेलबाद करत न्‍यूझीलंडला तिसरा धक्‍का दिला. सात षटकांच्‍या खेळानंतर न्‍यूझीलंडने १० धावांवर ३ गडी गमावले. दहाव्‍या षटकात हार्दिक पंड्याने आपल्‍याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत डेव्‍हॉन कॉनवेला बाद केले. त्‍याने १६ चेंडूत ७ धावा केल्‍या. १० षटकांच्‍या खेळानंतर न्‍यूझीलंडने १५ धावांवर ४ गडी गमावले होते. यानंतर पुढील षटकातच शार्दुल ठाकूरने कर्णधार टॉम लॅथमला बाद केले. त्‍याने स्‍लीपमध्‍ये शुभमनकडे सोपा झेल दिला. केवळ १५ धावांवर न्‍यूझीलंडचा निम्‍मा संघ तंबूत परतला.

शमीसह भारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी

ग्लेन फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनी डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र मोहम्‍मद शमीने २२ धावांवर खेळणार्‍या ब्रेसवेला बाद केले. ५६ धावांवर न्‍यूझीलंडने ६ गडी गमावले होते. ३१ व्‍या षटकातील पहिल्‍याच चेंडूवर हार्दिक पांड्याने मिचेल सँटनरही २७ धावांवर बाद त्रिफळाचीत केले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपला भेदक मारा सुरुच ठेवला.  ३१ व्‍या षटकात न्‍यूझीलंडने ७ गडी गमावत १०३ धावा केल्‍या आहेत. ३२ व्या षटकांत वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला आठवा धक्का दिला. सुंदरने ग्लेन फिलिप्सला आउट केले. त्याचा झेल सूर्यकुमार यादवने टिपला. ३४ व्‍या षटकात वॉशिंग्टन सुंदरने लॉकी फर्ग्युसनची विकेट घेतली. अखेर कुलदीप यादवने ब्लेअर टिकनर बाद केले. ३४. ३ षटकांमध्‍येच अवघ्‍या १०८ धावांमध्‍ये न्‍यूझीलंडचा डाव आटोपला.

न्‍यूझीलंडच्‍या केवळ तीन फलंदाजांना पार करता आला दुहेरी धावांचा आकडा

मोहम्‍मद शमी ३, हार्दिक पंड्या व वॉशिंग्टन सुंदर प्रत्‍येकी दोन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांनी प्रत्‍येकी एक विकेट घेतली. ग्लेन फिलिप्स ३६, मिचेल सँटनर २७ आणि मायकेल ब्रेसवेल याने २२ धावा केल्‍या. या तिघांना वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावांचा आकडा पार करता आला नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT