Latest

INDvsENG Test Series : विराट कोहलीच्या जागी मध्य प्रदेशच्या ‘या’ फलंदाजाचा टीम इंडियात समावेश

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (25 जानेवारी) सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहली मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही. वैयक्तिक कारणामुळे त्याने आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे त्याच्या जागी मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यादरम्यान रजत पाटीदार उपस्थित होता. तो टीम इंडियामध्ये सामील झाल्याची जोरदार चर्चा आहे. रजत हा रणजी करंडक विजेत्या संघाचा सदस्य आहे. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. नुकतेच त्याने अहमदाबाद येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना पहिल्या अनौपचारिक कसोटीत 151 धावा फटकावल्या. यापूर्वी पाटीदारने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्यात 111 धावा केल्या होत्या. 30 वर्षीय पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि त्याची आकडेवारी जबरदस्त आहे. (INDvsENG Test Series)

पाटीदार नऊ महिने क्रिकेटपासून दूर (INDvsENG Test Series)

पाटीदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 45.97 च्या सरासरीने 4000 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 शतके झळकावली आहेत. मध्य प्रदेशला रणजी चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रजतने 2021-22 हंगामात नऊ डावांत 82.25 च्या सरासरीने 658 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता. रजतने मुंबईविरुद्धच्या फायनलमध्ये मॅचविनिंग शतक झळकावले होते.

2023 मध्ये टाचेच्या दुखापतीमुळे पाटीदार जवळपास नऊ महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याच्या लंडनमध्ये शस्त्रक्रिया करावी लागली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याच्या कारकिर्दीचा आलेख आता खूप उंचावर पोहोचला आहे.

2000 सालापासून केवळ 6 भारतीय खेळाडूंनी वयाच्या 30 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. रजत पाटीदारला गुरुवारी हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी कॅप मिळाल्यास तो सूर्यकुमार यादवनंतरचा सातवा आणि केवळ दुसरा स्पेशालिस्ट फलंदाज ठरू शकतो.

विराट कोहलीच्या जागी निवडलेल्या पाटीदारने मध्य प्रदेशसाठी त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत मुख्यतः तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याची लाल बॉल क्रिकेटमधील आकडेवारी प्रभावी आहे. त्याने 93 डावांमध्ये 45.97 च्या सरासरीने 4000 धावा केल्या आहेत, ज्यात 12 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या नऊ वर्षांच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत त्याने कठीण खेळपट्ट्यांवर धावा करणारा फलंदाज म्हणून छाप पाडली आहे.

विराटबद्दल बीसीसीआय काय म्हणाले?

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले की, 'विराट कोहलीने वैयक्तिक कारण सांगून बीसीसीआयला इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली आहे. या विषयी त्याने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली आहे. मीडिया आणि चाहत्यांनी विराटच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणांवरून अंदाज लावणे टाळावे. बोर्ड आणि संघ व्यवस्थापन विराटच्या पाठीशी असून आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. दरम्यान, कसोटी मालिकेत प्रशंसनीय कामगिरी करण्यासाठी उर्वरित संघाच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे', असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT