पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. विराट कोहली (Virat Kohli) मोहालीतील पहिल्या सामन्यात खेळणार नसून वैयक्तिक कारणांमुळे त्याने माघार घेतली आहे. याबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करतील, असेही द्रविड यांनी स्पष्ट केले.
भारत आणि अफगाणिस्तान 11 जानेवारीपासून द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जाणार आहे. प्रशिक्षक द्रविड म्हणाले की, कोहली इंदूर आणि बंगळूर येथे अनुक्रमे 14 आणि 17 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी संघात सामील होईल.
गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माचा (Rohit Sharma) 14 महिन्यांनंतर टी-20 संघात समावेश केला होता. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारताची ही एकमेव आंतरराष्ट्रीय मालिका आहे. अशातच संघ मोहालीत पोहचला असून विराट कोहली अद्याप संघात सामील होऊ शकलेला नाही. त्याची मुलगी वामिकाचा वाढदिवस 11 जानेवारीला आहे, त्यामुळेच तो पहिल्या टी-20 साठी अनुपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोहली हा टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 115 सामन्यात 4008 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये 4000 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. कोहलीने नोव्हेंबर 2022 पासून एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने अॅडलेडमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, पण टीम इंडियाने तो सामना गमावला होता. तेव्हापासून कोहली या फॉरमॅटपासून दूर होता.