Latest

Good News : नोकरकपातीचे सोडा; उलट यंदा मिळणार मोठी पगारवाढ

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2023च्या पहिल्या सहामाहीत नोकरकपातीचे प्रमाण कमी राहणार असून भारतीय कर्मचाऱ्यांना २० टक्केपर्यंत वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. Naukri.com या वेबसाईटच्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा टेक कंपन्यांच्या बरोबरीनेच बायजूस, गो मेकॅनिक अशा स्टार्टअपमधूनही मोठी कर्मचारी कपात झाली आहे, या पार्श्वभूमीवर Naukri.comने जाहीर केलेले निष्कर्ष आशादायी ठरले आहेत.

Naukri.comने १० क्षेत्रातील १४०० कंपन्या आणि नोकरभरतीशी संबंधीत सल्लागार कंपन्यांशी बोलून हा निष्कर्ष काढला आहे. बहुतांश कंपन्यांनी २०२३च्या पहिल्या सहामाहीत नोकरकपातीचे प्रमाण कमी राहील असे म्हटले आहे. यातील फक्त ४% कंपन्यांनी कर्मचारी कपात त्यांच्या कंपन्यांत महत्त्वाचा विषय असल्याचे म्हटले आहे. जी नोकरकपात होईल, ती आयटी आणि वरिष्ठ पदावरील कर्मचारी यांच्यात जास्त प्रमाणात असेल. तर बिझनेस डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स, ऑपरेशन्स यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नोकरकपातीचा फटका कमी बसणार आहे. तर सर्वांत कमी परिणाम हा फ्रेशर्ससाठीच्या जागांवर होणार आहे.

नवी नोकरभरती होणार

Naukri.com वर्षांतून दोन वेळा हा सर्व्हे करते. Naukri.com ने म्हटले आहे की, "जी नोकरकपात होईल, ती वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांची असेल, असे २० टक्के कंपन्यांनी म्हटले आहे."

पहिल्या सहामाहीत कर्मचाऱ्यांचे नोकरी बदलण्याचे प्रमाण १५ टक्के राहील, असे या पाहणीत दिसले आहे.

या पाहणीत सहाभागी तर ९२ टक्के कंपन्यांनी नोकरभरतीबद्दल आशावादी असल्याचे म्हटले आहे. निम्म्या कंपन्यांनी नवी नोकरभरती, आणि सोडून गेलेल्या जागांवरील पर्यायी भरती होईल असे म्हटले आहे. तर २९ टक्के कंपन्यांनी नवी नोकरभरती होईल, असे म्हटले आहे.

पगारवाढ मिळणार

कर्मचाऱ्यांना यावेळी २०टक्केपर्यंत पगारवाढ मिळू शकेल, असेही हा पाहणीत सहभागी कंपन्यांनी म्हटले आहे. तसेच कँपस भरतीतीबद्दलही आशादायी चित्र असल्याचे सहभागी कंपन्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT