Latest

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे, अनिल परबांच्या निकटवर्तीयांवर आयकर छापे

backup backup

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित व्यक्तींवर ठिकठिकाणी मंगळवारी सकाळी आयकर विभागाने छापे घातले. मुंबई आणि पुणे येथे सुमारे 35 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिर्डी देवस्थान संस्थानचे विश्वस्त, युवासेनेचे पदाधिकारी, उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील 'नाईन अल्मेडा' इमारतीतील घरी झाडाझडती घेण्यात आली. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्या घरावरही आयकर विभागाने छापा घातला. (Aditya Thackeray)

कनाल यांच्या इमारतीभोवती केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिवहनमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरावरही आयकर विभागाने छापा घातला आहे. शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे ते संघटक आहेत. ते केबल व्यावसायिक असून, अंधेरीतील कैलासनगरमध्ये असलेल्या 'स्वान लेक' या इमारतीत राहतात.

आयकर विभागाने 25 फेब्रुवारी रोजी पहाटेपासून मुंबई महापालिकेचे तत्कालीन स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरासह कार्यालये, निकटवर्तीय आणि महापालिकेशी संबंधित पाच कंत्राटदारांकडे शोधमोहीम राबविली. चार दिवस ही कारवाई सुरू होती. अधिकार्‍यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल दस्तऐवज जप्त केले.

यामध्ये कंत्राटदार आणि यशवंत जाधव व निकटवर्तीयांमध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी तब्बल 130 कोटी रुपये किमतीच्या तीन डझन स्थावर मालमत्तांचे तपशील आणि पालिका कंत्राटदारांनी तब्बल 200 कोटींचे उत्पन्न लपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या कारवाईत 2 कोटींच्या रोख रकमेसह सुमारे दीड कोटीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आयकर विभागाला सुमारे एक डझन बनावट कंपन्यांची माहिती मिळाली असून, याच्याशी संबंधित बँक खाती, 10 बँक लॉकरवर निर्बंध आणत तपास सुरू असल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे.

Aditya Thackeray : आरटीओ अधिकारी खरमाटे यांच्या पुणे व सांगलीतील घरांवर छापे

प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या पुणे व सांगलीतील घरांवरही आयकर विभागाने मंगळवारी छापे घातले. आयकर विभागाने मंगळवारी सकाळपासून शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांच्या निकटवर्तीयांची घरे आणि कार्यालयांवर छापे घातल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT