Latest

Ind vs SA : भारतासाठी विजयाच्या अपेक्षांची ‘कटी पतंग’

backup backup

भारताने 2021 ची सुरुवात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका विजयाने केली आणि वर्षाचा शेवट जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून केला तेव्हा सर्वांच्या अपेक्षा होत्या त्या 2022 ची सुरुवातही द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयाने होईल; पण तसे झाले नाही. पहिली कसोटी हरल्यानंतर द. आफ्रिकेच्या डीन एल्गरच्या संघाने एल्गार केला आणि भारताला 2-1 असे हरवले. विजयाच्या अपेक्षांची 'कटी पतंग'-भारताच्या पराभवाची कारणमीमांसा करायची झाली तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि कर्णधाराचे डावपेच या चार विभागांत करावी लागेल. (Ind vs SA)

दोन्ही संघांच्या अनुभवाचा विचार केला तर भारतीय संघ द. आफ्रिकेच्या संघापेक्षा केव्हाही अनुभवात उजवा होता. या अनुभवाला झुकते माप देत आपण फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर ऐवजी पुजारा आणि रहाणेला संधी देत बसलो. खरं सांगायचे तर रहाणे आणि पुजारा भले त्या 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे हीरो असतील; पण त्या इतिहासाचे गोडवे आपण आता गाऊ शकत नाही.

आपल्याकडे अय्यर, विहारीसारखे ताज्या दमाचे अनेक खेळाडू संघाचे दार ठोठावत असताना अनुभव का गुणवत्ता हा प्रश्‍न गौण ठरतो. रहाणे आणि पुजाराला फॉर्ममध्ये यायला आपण खूप संधी दिल्या; पण त्यांचे 'शेल्फ लाईफ' संपले आहे.

ind vs sa पण ते 'मॅच विनर' ठरू शकतील का

एखाद्या कितीही गुणकारी औषधाची मुदत संपल्यावर ते घेत बसले तर त्याचा गुण येत नाही. तसेच, रहाणे-पुजारा त्यांच्या गुणवत्तेवर 40-50 चा टप्पा गाठू शकतील; पण ते 'मॅच विनर' ठरू शकतील का शंका आहे. रहाणेने गेल्या 40 डावांत 30.45 च्या सरासरीने 1,157 धावा केल्या आहेत. तर, पुजाराने गेल्या 40 डावांत 27.74 च्या सरासरीने फक्‍त 1,082 धावा केल्या आहेत. यांच्या आकडेवारीपेक्षा जास्त खुपते ते दोघांचे वारंवार त्याच पद्धतीने बाद होणे.

रहाणेचे धड ना फ्रंट फूट धड ना बॅकफूटवर खेळणे जलदगती गोलंदाजांना ऑफ स्टम्पच्या रोखाने बॅक ऑफ लेंग्थ टप्प्याने त्याचा यष्टींमागे सहज बळी मिळवून देतात. पुजाराच्या बॅटचा कोन किंवा बरगड्यांच्या दिशेने येणार्‍या उसळत्या चेंडूंना खेळण्याच्या तंत्रातला फोलपणा आता वारंवार उघडा पडत आहे.

मुळात त्याच्याकडे फटक्यांची मर्यादा आहे. त्यामुळे खेळ बदलायला विशेष वाव नाही. या दोघांना आपले दिवस संपलेत हे आता कळून चुकले असेल. कोहलीने तिसर्‍या कसोटीत ज्या निर्धाराने टिच्चून फलंदाजी केली तशी अपेक्षा यापुढे रहाणे किंवा पुजाराकडून करणे अवास्तवी ठरेल.

भारतीय गोलंदाजी ही जगातली एक उत्तम गोलंदाजी

सध्याची भारतीय गोलंदाजी ही जगातली एक उत्तम गोलंदाजी आहे; पण ज्या प्रमाणात रबाडा आणि कंपनीला यश मिळाले त्या प्रमाणात आपले गोलंदाज फायदा उठवू शकले नाहीत. याचे कारण मी दुसर्‍या कसोटीसाठी तरी कर्णधार राहुलच्या डावपेचांशी जोडीन. राहुलचे अनाकलनीय गोलंदाजीतील बदल आणि बचावात्मक क्षेत्ररक्षण यामुळे आपण उत्तम गोलंदाजांचा ताफा असूनही वर्चस्व गाजवू शकलो नाही. शेवटी विजय मिळवायला प्रतिस्पर्ध्यांचे 20 बळी मिळवावेच लागतात.

द. आफ्रिकेच्या एल्गर मार्कराम या अनुभवी जोडीनंतर पीटरसन – वॅन डर-डुसेन यांचा कसोटीतील एकत्र अनुभव 18 सामन्यांचा आहे. हा अडथळा दूर करण्यात आपण वारंवार अपयशी ठरलो. खेळपट्टीच्या ज्या भागातून चेंडू असखल उसळत होता किंवा खाली बसत होता त्याचा फायदा उठवण्याऐवजी आपल्या गोलंदाजांनी राऊंड द विकेट मारा का केला हे ही कोडेच आहे.

1992 पासून आपण द. आफ्रिकेचा किल्ला भेदू शकलो नाही. 2019 ला हा पराक्रम श्रीलंकेने केला. यावेळी आपल्याला चांगली संधी होती; पण विजयाचा गोड तीळगूळ मिळायच्याऐवजी आपल्याच मालिका विजयाच्या अपेक्षांचा पतंग कापला गेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT