Latest

देशातील सुंदर सापांच्या यादीतला साप नाशिकच्या इगतपुरीमध्ये

गणेश सोनवणे

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा ; नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील विपश्यना केंद्रापासून जवळच असलेल्या शैलेश सोपनर यांच्या शेतात सर्पमित्राने हरणटोळ जातीच्या सापाला पकडून फणसवाडी येथील काजूच्या वनात नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.

सोपनर यांचा शेतातील एका झाडावर हिरव्या रंगाचा साप असल्याचे महिलांच्या लक्षात आल्यावर साप बघताच त्यांची पाचावर धारण बसली. साप दिसल्याची माहिती त्यांनी सर्पमित्र विशाल गायकवाड यांना मोबाइलद्वारे दिली. या माहितीच्या आधारे सर्पमित्र गायकवाड यांनी शेतात जाऊन या सापाला पकडून फणसवाडी येथील काजूच्या वनात नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे. हा साप हरणटोळ जातीचा असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सुंदर सापांच्या यादीत हरणटोळने स्थान मिळवलेले आहे. हा साप निमविषारी असून, तो बहुतांशवेळी हिरवळीतच आढळतो.

सापाचा रंगही हिरवा आणि तो हिरवळीतच असल्यामुळे अनेकदा साप असल्यानंतरही त्या ठिकाणी साप असल्याचे लक्षात येत नाही. शहरात या सापाचे वास्तव्य क्वचितच आढळत असल्याचे सर्पमित्र यांनी सांगितले आहे.

हा हरणटोळ जातीचा साप निमविषारी आहे. त्याच्या विषाचा गंभीर परिणाम मनुष्याच्या शरीरावर होत नाही. मात्र, उंदीर, ससा, बेडूक अशा प्राण्यांसाठी त्याचे विष जीवघेणे आहे. हा साप दुर्मीळ सापांमध्ये येत नसला, तरीही तो क्वचितच आढळतो.
– विशाल गायकवाड, सर्पमित्र

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT