Latest

शिरूर-आंबेगावमध्ये महायुतीत मनोमिलनाचे संकेत

अमृता चौगुले

शिक्रापूर : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी होऊन भाजपा शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे महायुतीचे सरकार तयार झाले. नैसर्गिक युतीच्या दृष्टीने शिवसेना व भाजपा एकत्र आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ही युती स्वीकारली होती. राज्यपातळीवरील महायुती स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये रुजणार की नाही याबाबत संशयाचे वातावरण होते, परंतु आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मनोमिलन होताना दिसत आहे. भाजपही त्यांच्यासोबत जात असल्याने या मतदारसंघात मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत.

आंबेगाव-शिरूर विधानसभेचे प्रतिनिधी व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आंबेगाव-शिरूरच्या भाजपाच्या समन्वयक जयश्री पलांडे यांनी नागपूर येथे एकत्र येत महायुतीच्या मनोमिलनानाचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी 'पक्षांच्या नेत्यांचा एकत्र काढण्यात आलेला फोटो जपून ठेवा' अशी मिश्कील टिप्पणी दिलीप वळसे पाटील यांनी केली.आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी पारंपरिक लढत होत असते. कट्टरतेने प्रत्येक निवडणूक लढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविषयी कटुता आहे. वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्यामध्ये राजकीय भूमिकेमुळे दुरावा निर्माण झाला होता,परंतु हे दोन्ही नेते त्यांच्या पक्षाचे प्रमुख असल्यामुळे समन्वयाची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात झालेल्या महायुतीमुळे आढळराव पाटील व वळसे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकमेकांशी जुळवून घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे एका प्रमुख नेत्यांने सांगितले. यामुळे स्थानिकपातळीवरील कार्यकर्तेदेखील आता मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच हे नेते दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विवाह समारंभ तसेच सुख-दुःखाच्या प्रसंगांमध्ये उपस्थित राहताना दिसत आहेत. महायुतीमध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे. या पक्षाचा महायुतीचा धर्म पाळताना आंबेगाव-शिरूर विधानसभेच्या समन्वयक जयश्री पलांडे यादेखील दिसून येत आहे. पलांडे यांनी आढळराव पाटील व वळसे पाटील यांना आपल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले असून, आंबेगाव-शिरूरमध्ये महायुतीचे सूर आळवले जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT