Latest

Diamond Found :२० वर्षांच्‍या कठोर मेहनतीनंतर व्‍यापार्‍याला सापडला कोट्यवधी रुपयांचा हिरा!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

बहुमूल्‍य हिरा सापडणारे ठिकाण, अशी मध्‍य प्रदेशमधील पन्‍ना जिल्‍ह्याची ओळख  ( Diamond Found ) हा जिल्‍हा पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. कारणही तसेच आहे. येथील एका मध्‍यमवर्गीय व्‍यापार्‍याला बहुमूल्‍य हिरा सापडला आहे. त्‍याची किंमत कोट्यवधी रुपये असून, त्‍यांनी हिरा कार्यालयात जमा केला आहे. याचा लिलाव २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Diamond Found : २० वर्षांचा शोध… अखेर हिरा सापडला

पन्‍ना जिल्‍ह्यातील नगर किशोरगंज परिसरातील रहिवासी असणारे सुशील शुक्‍ला एक मध्‍यमवर्गीय व्‍यापारी आहेत. मागील २० वर्षांहून अधिक काळ ते पन्‍नाच्‍या भूमीत हिरा शोधत होते. हिर्‍यांच्‍या खाणीत त्‍यांनी कठोर मेहनत केली. २७ जानेवारी रोजी त्‍यांनी हिरा कार्यालयातून कृष्‍ण कल्‍याणपूर परिसातील हिरा खाणीत उत्‍खननाची परवानगी मिळवली. त्‍यांनी आपल्‍या पाच साथीदारांसह हिर्‍याचा शोध सुरु केला. अखेर त्‍यांच्‍या शोधाला २१ फेब्रुवारी रोजी पूर्णविराम मिळाला.

Diamond Found : तब्‍बल २६.११ कॅरेटचा बहुमूल्‍य हिरा मिळाला

सुशील शुक्‍ला यांना तब्‍बल २६.११ कॅरेटचा बहुमूल्‍य हिरा मिळाला. उत्‍खननामध्‍ये सापडलेला हिरा पाहून सुशील शुक्‍ला व त्‍यांचे साथीदारांना अश्रु अनावर झाले. तब्‍बल वीस वर्ष ज्‍याचा शोध सुरु होता. प्रत्‍येक क्षणाला त्‍याचा ध्‍यास होता ते त्‍यांना मिळाले. यामुळे त्‍यांच्‍या भावना अनावर झाल्‍या. हिरा मिळल्‍यानंतर त्‍यांनी तत्‍काळ तो हिरा कार्यालयात त्‍यांच्‍या नावावर जमा केला आहे. आता २४ फेब्रुवारी रोजी त्‍याचा लिलाव होणार असून, ते पैसे सुशील शुक्‍ला व त्‍यांच्‍या साथीदारांना मिळणार आहेत.

 पन्‍ना जिल्‍ह्यात सापडेला हा सर्वात मोठा चौथा हिरा

शुक्‍ला यांना खाणीत सापडेल्‍या हिर्‍या बद्‍दल माहिती देताना हिरा कार्यालयातील अधिकारी रवि पटेल यांनी सांगितले की, पन्‍ना जिल्‍ह्यात सापडेला हा सर्वात मोठा चौथा हिरा ठरला आहे. यापूर्वी १९६१ मध्‍ये सर्वात मोठा ४४.४३ कॅरेटचा हिरा मिळाला होता. यानंतर २०१८मध्‍ये ४२.२९ तर २०१९ मध्‍ये २९.४६ कॅरेटचा हिरा सापडला होता. यानंतरचा हा चौथ्‍या सर्वात मोठा हिरा ठरला आहे. या हिर्‍याची किंमत कोट्यवधी रुपये असून आता २४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या लिलावानंतर शुक्‍ला यांनी किती कोटी रुपये मिळणार हे स्‍पष्‍ट होणार आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT