ठाणे : पुढारी वृत्तसेवा कल्याण पूर्वेचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस ठाण्यातील गोळीबाराला राजकीय वळण यायला सुरुवात झाली आहे. गोळीबारानंतर भाजप मधील शांतता आता उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री नेवाळीत भाजप कल्याण पूर्व श्री मलंगगड मंडळाची गुप्त बैठक पार पडली असून, या बैठकीत ठराव घेऊन भाजपने आमदार गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. या बैठकीचा फोटो आणि ठराव दैनिक पुढारीच्या हाती लागला आहे.
कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात असलेल्या श्री मलंगगड मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या द्वारलीतील जमिनीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून करण्यात आला होता. गोळीबारानंतर भाजपाकडून कोणत्याही प्रकारची भूमिका हि स्पष्ट केली जात नव्हती. कोणतेही भाजपाचे पदाधिकारी समोर देखील येण्यास तयार नव्हते. मात्र आता भाजप श्री मलंगगड मंडळाने गुरुवारी रात्री नेवाळीत गुप्त बैठक घेत आमदार गायकवाड याना पाठिंबा दिला आहे.
या बैठकीमध्ये असे ठराव करण्यात आले की, खासदार श्रीकांत शिंदे यांचा आमदारांच्या पाठपुराव्याने मंजूर निधी, जिल्हा परिषद सदस्य निधीत, ग्रामपंचायत स्तरावरील निधीत, जन सुविधा, नागरी सुविधा या निधीत सुद्धा वाढता हस्तक्षेप. विकास कामांच्या पाठपुरावा करुन मंजुर कामांच्या ठिकाणी श्रेय घेण्यासाठी पाट्या लावणे. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी हे लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने मंजुर झालेल्या कामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण श्रेय घेण्यासाठी अगोदरच भूमिपूजनकरत होते. या गोष्टीमुळे आमच्या श्रीमलंग मंडळातून खासदारांच्या मनमानी कारभारा विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे ठरले. ग्रामीण कार्यकर्ते वेळोवेळी या बाबत वरिष्ठांकडे तक्रार करत होते.
आमदार गणपत गायकवाड यांनी जी कृती केली. ती करण्याअगोदर त्यांना सुपर मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे यांचा जो त्रास होता त्याची हि उस्फूर्त प्रतिक्रिया गोळीबाराच्या रूपाने बाहेर आली आणि म्हणूण आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे श्री मलंग परिसरातील सर्व भाजपा पदाधिकारी ठामपणे उभे राहतील असं या ठरावात म्हटले आहे. भाजपा कडून घेण्यात आलेल्या ठरावात खासदार शिंदे यांना सुपर मुख्यमंत्री म्हणण्यात आले आहे. त्यामुळे सध्या भाजपची खासदार शिंदे यांच्याबद्दल असलेली नाराजी देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपा मधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते आमदार गायकवाड यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कठोर भूमिका घेणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :