मुंबई : घोसाळकरांच्या गोळीबाराची चौकशी होणार; वैयक्‍तिक वैमनस्‍यातून घडलेली घटना : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

मुंबई : घोसाळकरांच्या गोळीबाराची चौकशी होणार; वैयक्‍तिक वैमनस्‍यातून घडलेली घटना : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ; पुढारी ऑनलाईन अभिषेक घोसाळकर यांच्यावरील झालेल्‍या गोळीबाराची चौकशी सुरू आहे, पोलिस योग्‍य वेळी गोष्‍टी उघड करतील. अशा गोष्‍टींचं कोणीही राजकारण करू नये. ही घटना वैयक्‍तिक वैमनस्‍यातून झालेली आहे. त्‍यामुळे कायदा व सुव्यवस्‍था बिघडलीय असं बोलणं अयोग्‍य आहे असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. माध्यमांशी बोलताना त्‍यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

घोसाळकर आणि मॉरीस यांनी एकत्र कामही केलं आहे. त्‍यांच्यातील वैयक्‍तिक वैमनस्‍यातून ही घटना घडली आहे. या घटनेवरून विरोधकांकडून होत असलेल्‍या राजीनाम्‍याच्या मागणीवर बोलताना फडणवीस यांनी या घटनेचं कोणीही राजकारण करू नये. गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात अशी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची गुरूवारी संध्याकाळी गोळ्या घालून हत्‍या करण्यात आली. मॉरीस नोरोन्हा हा एकेकाळचा शत्रू मित्र बनला आणि आपल्‍या घरी कार्यक्रमाला निमंत्रित करून त्‍यानेच अभिषेक यांचा घात केला. हा घातपात घडवल्‍यानंतर मॉरीसनेही स्‍वत:च्या डोक्‍यात गोळ्या झाडून घेत आत्‍महत्‍या केली.

 

Back to top button