Latest

Exercise : व्यायामाचे फायदे मिळत नसल्यास…

अनुराधा कोरवी

दररोज व्यायाम करणे हा निरोगी आयुष्याचा कानमंत्र आहे. पण अनेकांना व्यायाम करूनही अपेक्षित फायदे मिळत नाहीत. परिणामी, अनेक जण व्यायाम सोडून देण्याचाही विचार करताना दिसतात. असे का होते? ( Exercise )

संबंधित बातम्या 

व्यायामादरम्यान काही जण चुका करतात. या चुका किरकोळ वाटत असल्या तरी त्यामुळे चांगले रिझल्ट मिळत नाहीत. म्हणूनच योग्य पद्धतीने वर्कआऊट करणे गरजेचे आहे. दररोज वर्कआऊट करण्याबरोबरच डाएटही चांगले असणे गरजेचे आहे.

यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे झोप. ज्या मंडळींची चांगली झोप होत नाही, त्यांच्यात भूक वाढवणारे हार्मोन रीलिज होतात. भूक लागल्याने वाटेल ते खाण्याचा मोह होतो. परिणामी, कॅलरी इंटेक वाढतो आणि वजन कमी होत नाही. काही संशोधनानुसार, कमी झोपेमुळे मेटाबॉलिज्म संथ राहतो. म्हणून दररोज सात ते आठ तास चांगली झोप घेणे गरजेचे आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे, एकाच प्रकारे व्यायाम. असे करत राहिल्यानेही अपेक्षित परिणाम पदरात पडत नाहीत आणि आपण नाराज होतो. त्यामुळे ट्रेनरच्या सल्ल्यानुसार व्यायाम करत राहा आणि त्यात बदल करत राहा. वर्कआउटचा चांगला परिणाम येण्यासाठी आपली मर्यादा वाढवायला हवी.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वर्कआऊटनंतर स्नायू रिकव्हरीसाठी वेळ द्यावा लागतो. काही जण आठवड्यातील सातही दिवस व्यायाम करतात, हे चुकीचे आहे. सतत व्यायाम केल्याने बॉडी थकते. अशा वेळी विश्रांती न मिळाल्यास स्नायूंना वाढीसाठी वेळच मिळत नाही. म्हणूनच वर्कआऊट करत असताना आठवड्यातून एक ते दोन दिवसांचा ब्रेक घ्या. या दिवशी बागेमध्ये फिरा, चाला. पोहायला जा.

पॅक्ड फूड बंद करा

वजन कमी करण्याची किंवा मिळवण्याची गोष्ट समोर येते, तेव्हा न्यूट्रिशनवर सर्वाधिक भर दिला जातो. सकस आणि संतुलित आहारावर वजन कमी करण्यास मदत मिळते. संशोधनानुसार कोणतेही फिटनेस गोल मिळवण्यासाठी कमी किंवा अधिक आहार करण्यापेक्षा तुम्ही काय सेवन करता, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेहमीच पॅक्ड फूडपासून दूर राहणे गरजेचे आहे. अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी कंपन्यांकडून रासायनिक पदार्थांचे मिश्रण केले जाते. त्यामुळे वजनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

एकूणातच, व्यायाम करताना डाएटदेखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि वरील चुका टाळल्यास आपल्याला चांगले सकारात्मक परिणाम मिळू शकतात. म्हणूनच आपण चुकात सुधारणा करून संपूर्ण उत्साहाने व्यायाम केल्यास चांगले रिझल्ट दिसू लागतील. ( Exercise )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT