Latest

आता निवडणुका झाल्यास मोदींचीच सत्ता; ‘इंडिया टुडे’-‘सी व्होटर’च्या सर्वेक्षणात समोर आला ‘देशाचा आजचा मूड’

निलेश पोतदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर समाधानी असून, त्यांच्या लोकप्रियतेने तर कळस गाठला आहे. अशात आता देशात निवडणुका झाल्या, तर भाजपला २८४ जागा मिळतील, तर काँग्रेसला १९१ जागा मिळतील, असे चित्र 'इंडिया टुडे' आणि 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणात समोर आले आहे; महाराष्ट्रात मात्र भाजपच्या जागा कमी होतील, असे हे सर्वेक्षण सांगते. त्यानुसार राज्यात 'यूपीए'च्या जागा वाढून ३४ होतील.

लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होत असून, भाजपसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्राही सुरू आहे. अशा स्थितीत 'इंडिया टुडे'चा हा सर्व्हे गुरुवारी समोर आला आहे.

'इंडिया टुडे' – 'सी व्होटर' 

देशाचा मूड जाणून घेण्यासाठी सर्व्हे घेतला. त्यात देशातील १ लाख ४१ हजार नागरिकांची मते जाणून घेतली. देशातील ज्वलंत प्रश्नावर आपली मते व्यक्त केली आहेत. आताच्या परिस्थितीत लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोणत्या पक्षाचे सरकार बनणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? यावर लोकांनी मते दिली आहेत. या सर्वेक्षणातून केंद्रात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचे समोर आले आहे.

केंद्रात पुन्हा भाजपच 

सर्व्हेतून केंद्रात परत एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचे समोर येत आहे; तर काँग्रेसला १०० जागाही मिळणे कठीण दिसत आहे. देशातील एकूण ५४३ जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'ला २९८ जागा मिळतील, तर विरोधकांच्या 'यूपीए'ला १५३ जागा मिळतील, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. टक्केवारीनुसार, 'एनडीए' ला ४३ टक्के, 'यूपीए'ला ३० टक्के मते मिळतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. भाजपला आसाम, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात फायदा होत असल्याचे सर्व्हेमध्ये समोर आले. त्यानुसार आसाममध्ये १२ जागा (२०१९ मध्ये ९ जागा), तेलंगणात ६ जागा (२०१९ मध्ये ४ जागा), पश्चिम बंगालमध्ये २० जागा (२०१९ मध्ये १८ जागा) आणि उत्तर प्रदेशात ७० जागा (२०१९ मध्ये ६४ जागा) मिळतील, असे सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते. मात्र, 'यूपीए'च्या जागा काही राज्यांत वाढताना दिसत आहेत. त्यात कर्नाटकात १७ जागा (२०१९ मध्ये २ जागा), महाराष्ट्रात ३४ जागा (२०१९ मध्ये ६ जागा), बिहारमध्ये २५ जागा (२०१९ मध्ये फक्त १) 'यूपीए'ला मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात समीकरण बदलले 

• सर्वेक्षणात काँग्रेसप्रणित 'यूपीए'च्या जागा ३४ वर जातील, असे हे सर्वेक्षण सांगते. महाराष्ट्रात जुलैमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलत असल्याचे त्यावरून दिसते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा हाच आकडा चाळीसच्या आसपास जाईल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

मोदी यांची लोकप्रियता शिखरावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम असल्याचे सर्व्हेत समोर आले आहे. ७२ टक्के नागरिक मोदी यांच्या कामगिरीवर खूश असून, त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही ६७ टक्के लोक समाधानी आहेत. अँटी इन्कम्बन्सी, महागाई, कोरोना, परकीय शत्रूंचा धोका, चीनचा धोका आदी बाबी असतानाही सरकारबद्दल समाधानी असणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT