पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्य सचिव आणि इतर काही अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवत आहेत, अशी टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या टीकेला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उत्तर दिले आहे.
अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय माझा होता. गरज पडली तर मी अधिकाऱ्यांना गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्येही प्रशिक्षणासाठी पाठवेल. यावर कोणाचा आक्षेप का असावा? असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले आहेत. विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला भगवंत मान यांनी आज उत्तर दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर विरोधीपक्षांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली तेव्हा भगवंत मान उपस्थित नव्हते. आज भगवंत मान दुपारी ३ वा. केजरीवाल यांची भेट घेतील. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतून रिमोट कंट्रोलद्वारे पंजाबमधील सरकार चालवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू , भाजपचे मनजिंदर सिरसा आणि अकाली दलाचे दलजीत चीमा या सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. शिवाय अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी आशितोष यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. अरविंद केजरीवाल यांना पंजाब सरकार स्वतःला चालवायचे असेल तर, निवडणूक लढवून मुख्यमंत्री व्हावे, अशी टीका आशितोष यांनी केली होती.