बारामती : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो माझा दाखला आहे, तो खरा आहे. त्यावर नमूद जात व धर्म हे खरे आहे; मात्र, काही लोकांनी दुसरा ओबीसी असल्याचा दाखला फिरवला. ओबीसींबाबत आदर मला आहे. मात्र, जन्माने प्रत्येकाला जी जात असते ती मी लपवू शकत नाही. संपूर्ण जगाला माहिती आहे, माझी जात कोणती आहे. जातीवर समाजकारण, राजकारण मी आजवर केले नाही आणि करणार नाही; परंतु या वर्गाचे जे प्रश्न आहेत, त्यासाठी जो हातभार लावावा लागेल तो मी निश्चित लावेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामती पत्रकारांशी बोलताना दिली.
संबंधित बातम्या :
दिवाळी पाडव्यानंतर त्यानी पत्रकारांशी संवाद साधला. दुष्काळाबाबत खा. पवार म्हणाले, दुष्काळाबाबत योग्य माहिती केंद्र सरकारला पोहोचवायची होती ती माहिती राज्य सरकारला पोहोचवण्यात कमतरता आली म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावरसुद्धा हा प्रश्न मांडला. यामध्ये दुरुस्ती करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. सध्या मराठा-ओबीसी वाद पेटवला जात आहे का? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद नाही. काही लोक तसे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी पाडव्याला पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर असते. यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता पवार म्हणाले की, रोहित पवारांचा दौरा आहे. कोणाचा आजार असेल. गैरसमज करण्याचे कारण नाही असे म्हणत पवारांनी अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत बोलणे टाळले.
आरक्षणासंदर्भातील भावनांकडे दुर्लक्ष नको
मराठा व धनगर आरक्षणावर पवार म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न आहे. धनगर आरक्षणासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी तरुणांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांनी काही प्रश्न मांडले. जे प्रश्न केंद्राचे असतील ते तिथे मांडावे लागतील. मराठा आरक्षणा संदर्भात ते म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांच्या भावना तीव— आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य व केंद्र सरकारचा आहे.