पुढारी ऑनलाईन : वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंट्री 'इंडिया : द मोदी क्वेश्चन' दाखवण्याचे आयोजन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) कडून करण्यात आले होते. हैदराबाद विद्यापीठ परिसरात गुरुवारी (दि.२६) या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्यात आले. दरम्यान विद्यापीठ परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विद्यार्थी शाखा अभाविपने विद्यापीठ परिसरात 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट दाखवला. ABVP च्या विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारे वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंट्रीला विरोध दर्शवण्यात आला.
केंद्र सरकारने बीबीसीच्या या डॉक्युमेंट्री प्रदर्शनावर बंदी घातली आहे. दरम्यान SFI संघटनेने सोशल मीडियावर छायाचित्र प्रसिद्ध करत, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 'इंडिया : द मोदी क्वेश्चन' या डॉक्युमेंट्रीचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर या दिवशी यशस्वीरित्या या डॉक्युमेंट्रीचे प्रदर्शन झाले. यामध्ये ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला सहभाग दर्शवला.
याला प्रत्युत्तर म्हणून अभाविपच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात 'द काश्मीर फाइल्स'चे प्रदर्शन केले. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात पाकिस्तानी समर्थित दहशतवाद्यांकडून काश्मिरी हिंदूंच्या हत्येनंतर काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंच्या पलायनाचे चित्रण करण्यात आले आहे.