Latest

समोसा : मध्य आशिया ते चहाची टपरी व्हाया मुघल दरबार

मोहसीन मुल्ला

समोसा हा आपल्यातील अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. बऱ्याच वेळा ऑफिस आणि घरातील लहान पार्टी, गेट टुगेदर यांच्यासाठीची हमखास डिश म्हणजे समोसा आणि सोबतची लाल आणि हिरवी चटणी. भूक लागली असेल आणि पटकन काही खायचं असेल तर समोसा धावून येतो. शहरातील विविध स्वीटमार्ट, चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स अशा अनेक ठिकाणी समोसा हक्काची जागा घेऊन बसला आहे.पण गंमत म्हणजे समोसा ही मूळची भारतीय डिश नाही. वाचून तुम्हाला पटणार नाही; पण हे सत्य आहे.

समोसा या डिशचा पहिला संदर्भ हा १० व्या शतकात मध्य आशियातील इराणी इतिहासकार अबोलफाजी बेह्याकी यांच्या तारीक -ए- बेह्याकी या ग्रंथात मिळतो. या ग्रंथात समोसाचे नाव सांबोसा असे आहे. त्या काळातील समोसे लहान होते आणि व्यापारी लोक प्रवासात खाण्यासाठी समोस्याचा वापर करत. प्रवासात सोबत घेण्यासाठी समोसा हा त्या काळी सोईचा पदार्थ होता.

त्यानंतर समोस्याचा उल्लेख राजदरबारातील जो उल्लेख सापडतो तो आमिर खुस्रो यांच्या ग्रंथात. मटण, तूप आणि कांदा यांचा वापर करून समोसे बनले जात, असा उल्लेख आमिर खुस्रो यांच्या ग्रंथात आहे. तर इब्न बटुटा मुहंदम बिन तुघलक यांच्या दरबारात संबुसाक (समोसा) दिला जात होता असा उल्लेख केला आहे. तर ऐन इ अकबरी या ग्रंथात समोस्याचा उल्लेख सानबुसा असा आहे.
राजघराण्यातून नंतर समोसा सर्वसामान्यांत प्रसिद्ध झाला.

भारतात १५ ते २० प्रकारचे समाेसा बनवतात

आपल्याला समोसा म्हटले तर बटाट्याची भाजी घातलेला आणि त्रिकोणी आकाराचा चटकदार पदार्थ असेच चित्र डोळ्यापुढे येते; पण भारतात किमान १५ ते २० प्रकारे समोसा बनवला जातो. हैदराबादमध्ये लुखमी या नावाने समोस्याचा एक प्रकार प्रसिद्ध आहे. यात बटाटा भाजी न वापरता खिमा वापरला जातो. तर गुजरातमध्ये बिन्स आणि मटार यांचा समोसा बनतो. गोव्यातील एक समोसाही असाच मांसाहारी अवतारात आहे.

समोसा भारतात आला तसा तो जगातील इतर देशांतही पोहोचला. अरब देशांत समोसा हा संबुसाक या नावाने ओळखला जातो. याशिवाय ब्राझील, मोझंबिक, पोर्तुगाल या देशांतही समोसा प्रसिद्ध आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चहा आणि समोसा मटकावत असाल तेव्हा लक्षात ठेवा ही पदार्थ साधासुधा नाही, त्याला १० व्या शतकापासूनचा मोठा इतिहास आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT