पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि चीन हे जगातील दोनच असे देश आहेत, ज्यांच्या संस्कृतीत हजारो वर्षांचे सातत्य राहिलेले आहे. धार्मिक आचरण, सण, उत्सव, खाद्यपदार्थ, भाषा अशा कितीतरी बाबतीत हे सातत्य दिसून येते. भारतातील काही खाद्यपदार्थांना असाच दीर्घ इतिहास आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लाडू. दिवाळीच्या फराळात आपण विविध प्रकारचे लाडू बनवतो, या गोलमटोल लाडूला किमान २४०० वर्षांचा इतिहास आहे. आणि गंमत अशी की औषधी वापरासाठी लाडूचा शोध लागला आणि आपण नंतर त्याची मिठाई केली.
दिवाळीत रवा, बुंदी, बेसन असे किती तरी लाडू बनतात. बाजारात गेले तर लाडूच्या प्रकारांनी मिठाईची दुकाने अक्षरशः सजून गेलेली असतात. या लाडूचा इतिहास शोधायचा प्रयत्न केला तर सुश्रुत या ऋषींपर्यंत जाऊन पोहोचतो. सुश्रुत यांचे आयुर्वेदात फार मोठे योगदान आहे. लाडूचा वापर सर्वप्रथम त्यांनी केला होता, असे मानले जाते. आयुर्वेदातील कडू औषधे ते गोड लाडूतून द्यायचे. त्यामुळे रुग्णांना ही औषधे घेणे सोपे जायचे. काही लाडूंमध्ये गूळ आणि तीळ यांचा वापर होत असे आणि हे दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जातात. सुश्रुत संहितेत लाडूचा उल्लेखही आहे.
के. टी. आचार्य यांचे A Historical Dictionary of Indian Food यामध्ये लाडूबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. चोल साम्राज्यातील योद्धे त्यांच्यासोबत लाडू ठेवत असत. लाडूला चोल साम्राज्यात शुभ मानले जात असे. तसेच लाडू बरेच दिवस टिकून राहात, त्यामुळे युद्ध मोहिमांत लाडू सोबत ठेवणे योग्य ठरत असे.
उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये ठग्गू के लड्डू नावाचे एक दुकान फारच प्रसिद्ध आहे. ठग याचा अर्थ फसवणारा असा होतो. एखाद्या व्यावसायिकाने आपल्या दुकानाला असे नकारात्मक नाव का दिले असेल असा प्रश्न कुणालाही पडेल. तर झाले असे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता. त्या वेळी कानपूरमध्ये राम अवतार दारोदार फिरून लाडू विकत असत.
राम अवतार यांचे लाडू खपायचेही चांगले. राम अवतार महात्मा गांधींजीच्या विचारांवर चालणारे होते. गांधीजींच्या सभांना त्यांची हजेरी चुकत नसे. एका सभेत गांधीजींनी साखर म्हणजे पांढरे विष असते असे वक्तव्य केले होते. राम अवतार यांच्यावर याचा फार मोठा परिणाम झाला. साखर घातलेले लाडू विकून आणि लोकांची फसवणूक करतो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे साखरेबद्दल जनजागृती करण्यासाठी त्यांनी त्यांच्या लाडूचे नाव ठगू के लड्डू असे ठेवले. पण याचा परिणाम नंतर उलटाच झाला, ठग्गू के लड्डू यांची विक्री वाढतच गेली. कानपूरमध्ये ठग्गू के लड्डू आजही प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा