Latest

हिंगोली : कावड यात्रेत आमदार बांगरांनी नाचवल्या तलवारी; गुन्हा दाखल

मोनिका क्षीरसागर

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कावड यात्रेतील लोकांना तलवार दाखवल्याप्रकरणी आणि परवानगी नसतानाही डीजे लावल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहेत. कळमनुरी पोलिसात हे गुन्हे दाखल आहेत. सोमवारी (दि.२८) हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये आमदार बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हर हर महादेवच्या गजरात संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कावड यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते.

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी श्रावण महिन्यात दुसर्‍या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. मागील पाच ते सहा वर्षापासून कावड यात्रा काढली जात असून, कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत यात्रा काढली जाते. त्यानुसार सोमवारी या कावड यात्रेचे आयोजिन केले होते. मागील तीन महिन्यापासून त्याचे नियोजन करण्यात येत होते.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर लगेचच कावड यात्रा, असल्याने बांगर हे मोठे शक्तीप्रदर्शन करतील, अशी शक्यता होतीच. त्यानुसार बांगर यांनी तयारी देखील केली होती. मात्र, या कावड यात्रेतील लोकांना तलवार दाखवल्याप्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या यात्रेत परवानगी नसताना डीजे लावल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कळमनुरी पोलिसात हे गुन्हे दाखल आहेत.

चिंचाळेश्वर महादेव मंदिरात कालीपुत्र कालीचरण महाराज, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख (शिंदेगट) आनंदराव जाधव, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, वसमत तालुका प्रमुख राजू चापके, धनंजय पाटील यांच्या हस्ते पुजन केल्यानंतर कावड यात्रेला सुरवात झाली होती. या कावड यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. कळमनुरी ते हिंगोली सुमारे २० किलोमीटर अंतरापर्यंत पायी चालत असलेल्या कावड यात्रेकरुंसाठी दानशुरांनी ठिकठिकाणी शितपेय, पिण्याची पाणी, खिचडी, केळी, सफरचंद ठेवला होता. बम बम बोले, हर हर महादेवच्या गजरात कावड यात्रा हिंगोलीकडे पोहोचली. हिंगोली जिल्ह्यातील भाविकांनी यात्रेत सहभाग नोंदविला होता.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT