Latest

Hingoli Maratha Andolan : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, खांडेगाव पाटी येथे बस पेटवली; शिरड-शहापूरजवळ बसेसवर दगडफेक

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (दि. १६) जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान, वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटी येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. अज्ञात तरुणांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली. ज्यामुळे वसमत आगाराचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले. Hingoli Maratha Andolan

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्हयात २५ ठिकाणी आंदोलन झाले. हिंगोली ते परभणी, जिंतूर, वसमत ते नांदेड व परभणी, हिंगोली ते नांदेड या मार्गावर ठिकठिकाणी गावकर्‍यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे हिंगोली, वसमत व कळमनुरी आगारातून बसेस सोडण्यात आल्या नाहीत. तर ग्रामीण भागातूनही प्रवासी शहराकडे आले नाहीत. त्यामुळे बसस्थानकांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. Hingoli Maratha Andolan

तर शासकिय व निमशासकिय कार्यालयात बाहेरगावाहून येणार्‍या कर्मचार्‍यांची मोठी अडचण झाली. दरम्यान, वसमत ते परभणी मार्गावर खांडेगाव पाटीजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर आंदोलनापासून काही अंतरावर वाहने थांबविण्यात आली होती. आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वसमत आगाराची वसमत ते पुणे ही बस मार्गस्थ झाली होती. मात्र, खांडेगाव पाटीपासून काही अंतरावरच बस थांबविण्यात आल्याने त्यातील सर्व प्रवासी उतरून गेले होते.

दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरूणांनी बस पेटवून दिली. यावेळी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, उपनिरीक्षक यामावार, जमादार विजय उपरे, अविनाश राठोड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वसमत पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले. दोन तासांनी आग आटोक्यात आली. तोपर्यंत बसमधील सर्व सीट जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये महामंडळाचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या शिवाय शिरड शहापूर जवळ दोन बसवर दगडफेक झाल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, इतर ठिकाणी रास्ता रोको शांततेत पार पाडल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT